| पनवेल | प्रितिनिधी |
पनवेल शहरात थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या नावाने भव्य सभागृह उभारण्याची अधिकृत मागणी करण्यात आली आहे. क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशनच्या वतीने यासंदर्भात पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले.
संस्थेच्या शिष्टमंडळाने महापौरांची भेट घेऊन क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा तसेच सावित्रीबाई फुले यांचे पुस्तक भेट देत शुभेच्छा व्यक्त केल्या. त्यानंतर सभागृह उभारणीसंदर्भातील सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या आणि शिक्षण प्रसारासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या नावाने पनवेल शहरात अद्याप कोणतेही अधिकृत सभागृह किंवा स्मारक भवन उभारण्यात आलेले नाही. सामाजिक न्याय, स्त्री सक्षमीकरण आणि वंचित घटकांच्या उन्नतीसाठी त्यांचे कार्य ऐतिहासिक आणि प्रेरणादायी आहे. त्यामुळे महानगरपालिकेने नियमानुसार योग्य भूखंड निश्चित करून महासभेत ठराव मंजूर करावा व त्यांच्या नावाने भव्य सभागृह उभारण्याची प्रशासकीय प्रक्रिया तात्काळ सुरू करावी, अशी ठोस मागणी शिष्टमंडळाने केली आहे. संस्थेच्या अध्यक्षा रुपालीताई शिंदे यांनी सांगितले की, या मागणीची विधिवत दखल घेऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत सकारात्मक निर्णय जाहीर करावा, हीच अपेक्षा आहे. यावेळी सौ. स्नेहा धुमाळ, सौ. प्रिया गंगावणे, सौ. ज्योती तातरे, सौ. सुषमा मयेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. आता महानगरपालिका प्रशासन या मागणीवर कोणती भूमिका घेते, याकडे पनवेलकरांचे लक्ष लागले आहे.
सावित्रीबाई फुले सभागृहासाठी मागणी
