| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
बालमृत्यू दफनभूमीसाठी शासन स्तरावर पनवेल, नवीन पनवेल, खांदा कॉलनी व परिसरात जागा उपलब्ध करून देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक श्रम कामगार युनियनचे सरचिटणीस विनायक गांधी यांनी आमदार विक्रांत पाटील आणि रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
वाढते प्रदूषण तसेच निसर्गाच्या हानीमुळे मानवी जीवन जिकरीचे झाले आहे. सध्याच्या युगात नवोदयात बालकांमध्ये कमी दिवसात जन्माला येण्याचे प्रमाण वाढत आहे. अशातच सहाव्या आणि आठव्या महिन्यात जन्माला आलेली मुले अवयवात योग्य वाढ होत नसल्याने बहुदा मृत्युमुखी पडतात. त्यामुळे अशा आणि इतर बालकांच्या मृत्यूच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पनवेल परिसरात अशा प्रसंगी मृत बालकांच्या शवाला दफन करण्यासाठी नातेवाईकांना दफन जागेअभावी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अनेक तास या मृत बालकांच्या शवाची हेळसांड होत असते. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांचे प्रचंड हाल होत आहेत. तरी याविषयी गांभीर्याने लक्ष देऊन मृत बालकांच्या शवासाठी दफनभूमीच्या जागेची व्यवस्था उपलब्ध करून नातेवाईकांची होत असलेली अवहेलना दूर करावी, अशी मागणी विनायक गांधी यांनी केली आहे.






