| पाली | प्रतिनिधी |
पाली- खोपोली- वाकण राज्य महामार्गावर (क्र.548 अ) सातत्याने अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या गंभीर अपघातात अनेकांचा जीव गेला आहे, तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. काही वर्षांपूर्वी पाली- खोपोली- वाकण राज्य महामार्गचे नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. पाली ते खोपोली या मार्गाचे काँक्रिटिकरण झाले असल्याने या मार्गावरील सर्व वळणे व चढणं काढण्यात आली आहेत त्यामुळे वाहनांची गती बेसुमार वाढली आहे. परिणामी अपघातांच्या संख्येत असंख्य वाढ झाली आहे. या अनुषंगाने अपघातांना आळा घालण्यासाठी या मार्गावरील अपघाती क्षेत्र, शाळा, गावं, बाजारपेठा असलेल्या ठिकाणी गतिरोधक बसवून सूचना फलक लावण्याची मागणी ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने रायगड जिल्हाध्यक्ष नरेश गायकवाड यांनी सुधागड चे तहसीलदार उत्तम कुंभार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनाची प्रत रायगड जिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांना पाठवण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी रायगड जिल्हाध्यक्ष नरेश गायकवाड, मारुती गायकवाड, जाधव, आकाश कांबळे, निशांत पवार उपस्थित होते. गतिरोधक लवकरात लवकर गतिरोधक न बसविल्यास आंदोलनात्मक पवित्रा हाती घेत रास्तारोको करण्यात येणार असल्याचा इशारा पँथर सेनेने दिला आहे.







