| चिपळूण | प्रतिनिधी |
चिपळूण-गुहागर बाह्यवळणावरील वळण धोकादायक बनले असून, अपघातांची शक्यता वाढली आहे. या ठिकाणी गतीरोधक बसवून अपघातांना आळा घालावा, अशी मागणी महालक्ष्मी मित्र मंडळ, महालक्ष्मीनगर यांनी केली आहे. या संदर्भात मंडळाच्यावतीने सार्वजनिक बांधकाम उपविभाग (रोह्यो) चिपळूणचे उपअभियंता यांना लेखी निवेदन देण्यात आले.
मंडळाचे अध्यक्ष यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या मागणीवर आम्ही गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा करीत आहोत. सहा महिन्यांपूर्वी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करूनही अद्याप गतीरोधक बसविण्याची कारवाई झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. मंडळाने यापूर्वीही उपअभियंता आणि शाखा अभियंता यांना समस्येविषयी माहिती देऊन वारंवार भेटी दिल्या होत्या. त्यावेळी तांत्रिक कारणास्तव जिल्हाधिकारी व पोलीस विभागाकडून परवानगी आवश्यक असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, या परवानगी घेण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असून तातडीने कारवाई होणे आवश्यक आहे, असे निवेदनात नमूद केले आहे. बावशेवाडी येथे रस्त्याला दोन ठिकाणी टी-जॉइंट येतात तसेच वळण असल्याने वाहनांचा वेग वाढल्यास अपघाताची दाट शक्यता आहे. त्यामुळे तातडीने गतीरोधक बसविण्याची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.






