| श्रीवर्धन | वार्ताहर |
श्रीवर्धनचे एसटी स्थानक व आगार श्रीवर्धन शहराच्या बाहेर सुमारे एक कि.मी. अंतरावर असल्यामुळे सकाळी सात वा.पर्यंत सुटणार्या व सायंकाळी सात वा.नंतर येणार्या लांब पल्ल्याच्या मोजक्या गाड्या पूर्वापार श्रीवर्धन गावातून सुरू ठेवण्यात आल्या आहेत. माजी राज्यमंत्री व श्रीवर्धनचे सुपुत्र रवींद्र राऊत यांनी प्रवासी जनतेच्या सोयीसाठी ही व्यवस्था सुरु केली होती, ती आजतागायत सुरु आहे. या व्यवस्थेमुळे प्रवासी वर्गाची फार मोठी सोय होते. परंतु, श्रीवर्धन नगर परिषदेकडून गेले काही महिने रस्त्यांखालून नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरु असल्यामुळे न.प.च्या सूचनेनुसार तेव्हापासून गावातून येणारी एसटी बंद ठेवण्यात आली आहे. परंतु एसटीच्या मार्गावरील जलवाहिन्यांचे काम जवळजवळ पूर्ण झालेले असल्यामुळे फेर्या पूर्ववत सुरु कराव्यात, अशी प्रवासी वर्गाकडून जोरदार मागणी होत आहे.
दुसरे म्हणजे श्रीवर्धन आगारात आता श्री. मणेर हे नवीन आगार व्यवस्थापक आले आहेत. न.प.ने त्यांच्याकडे पत्र दिल्यास त्यांचीही गावांतील राऊंड सुरु करण्याची तयारी आहे, असे त्यांच्याशी चर्चा करता समजले. ते येथे हजर झाल्यापासून पूर्वी असलेली श्रीवर्धन-ठाणे (दु.2.30), श्रीवर्धन-डोंगरी (स. 4), श्रीवर्धन-बीड (स. 6),श्रीवर्धन-पनवेल (शिवशाही स.6.30) या गाड्या नव्याने सुरु करण्यात आल्याने प्रवासी वर्गाची मोठीच सोय झाली आहे. तरी नगर परिषदेने गांभीर्याने विचार करुन सकाळी 7 वा.पर्यंत सुटणार्या आणि सायं. 7 वा.नंतर येणार्या काही गाड्यांचे गावांतील फेर्या पुन्हा सुरु करण्याबद्दलचे पत्र एस.टी.आगाराकडे द्यावे, अशी नागरिक, प्रवासी वर्गाकडून जोरदार मागणी होत आहे.