पोलादपुरातील चोळईमधील सुपांना पसंती
| पोलादपूर | शैलेश पालकर |
गौरीचे वाण सूप ही एक कोकणातील पारंपरिक प्रथा आहे. ज्यामध्ये गणेशोत्सवाच्या काळात गौरीची पूजा करताना सुवासिनी (सवाष्ण स्त्रिया) गौरीसमोर भरलेले सूप ठेवून ओवाळतात. नव्याने लग्न झालेल्या मुलीसाठी हे व्रत विशेष महत्त्वाचे मानले जाते. नवीन लग्न झालेली मुलगी आपल्या माहेरच्या गौरीला आणि मग सासरच्या गौरीला सूप ओवाळते. सोशल मीडियाच्या जमान्यात ‘सुपली सोन्याची गं सुपली सोन्याची…’ या गाण्यावरील रिल्सने धुमाकूळ घातला आहे. मात्र, पोलादपूर तालुक्यातील चोळई बुरूडवस्तीतील विणलेल्या सुपांमधून आज हजारो माहेरवाशिणी सुहासिनींचा ओवसा पूजला जाणार आहे.
गौरीचे वाण असलेले सूप विणण्याची प्रथा कालबाह्य होऊ लागली आहे. मात्र, पोलादपूरलगतच्या चोळई गावातील बुरूड समाजाच्या लोकवस्तीमध्ये आजहीही सूप विणण्याची परंपरा कायम ठेवली आहे.
बांबू लागवड करण्यासाठी कोकणात गेल्या काही वर्षांपासून उदासीनता असल्याने बुरूड समाजाच्या या व्यवसायाला कच्च्या मालाची कमतरता भासत होती. गौराईच्या वाणासाठी सूप, डालगे, टोपल्या, कणग्या तसेच अन्य बांबूपासून बनविण्यात आलेल्या बुरूड समाजाच्या परंपरागत हस्तकला कौशल्याच्या वस्तूंची जागा प्लास्टिक आणि फायबरच तकलादू आणि महागड्या वस्तूंनी घेतली. मात्र, अशा परिस्थितीतही पोलादपूर तालुक्यातील सडवली ग्रुपग्रामपंचायत सडवली अंतर्गत चोळई गावातील बुरूडवस्तीमध्ये योगिता एकनाथ गायकवाड या महिलेने माहेरापासून जोपासलेली बुरूडकामाची परंपरा नेटाने सासरीदेखील सुरू ठेवली. बांबूपासून सूप विणताना योगिता गायकवाड यांनी आधीपासूनच बांबूच्या पट्ट्यांना रंग देऊन आकर्षकपणा आणण्याचे कसब दाखवून सुपांचा आकर्षकपणा अधिकच खुलविला आहे. यामुळे या सुपांचे आकर्षण नवविवाहितेच्या माहेरी तसेच सासरीदेखील वाखणले जात आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील पहिले गाव असलेल्या चोळईमध्ये हस्तकला केंद्र निर्माण झाल्यास या सुपांना अधिकच मागणी वाढेल, असा विश्वास योगिता गायकवाड यांना वाटत आहे.







