माहिती देण्यास कामचुकारपणा
| उरण | वार्ताहर |
उरण तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात शासकीय निधीत भ्रष्टाचार होत आहे. त्यामध्ये चाणजे ग्रामपंचायतीचा भ्रष्टाचार प्रकरण चव्हाट्यावर आले आहे. हा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागवूनही ग्रामसेवक यांच्याकडून माहिती दिली जात नाही. पत्रकार घन:श्याम कडू यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता, सदर माहितीची अधिकृत शुल्क पावती फाडून त्यानंतरही माहिती मिळत नसल्याने अपील करूनही आजतागायत माहिती तत्कालीन ग्रामसेवक भास्कर पालकर यांनी दिलेली नाही. त्यामुळे चाणजे ग्रामपंचायतचे तत्कालीन ग्रामसेवक भास्कर पालकर यांनी कामात कामचुकार केल्याप्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी पत्रकार घनश्याम कडू यांनी उरण पंचायत समिती गटविकास अधिकारी नीलम गाडे यांच्याकडे केली आहे. त्यावरही कारवाई करण्यास गटविकास अधिकारी गाडे मॅडम यांनी चालढकलपणा करीत ग्रामसेवक पालकर यांना वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.
चौदावा वित्त आयोग सन 2015 ते 2021 पर्यंतची सर्व माहिती तसेच मौजे चाणजे सिटी सर्व्हेच्या हद्दीत श्रॉफ व जयेश श्रॉफ यांच्या सुरू असलेल्या बांधकामांची माहिती असे माहितीच्या अधिकाराखाली दोन पत्राद्वारे माहिती दि. 20/7/2021 रोजी मागितली होती. त्यानंतर सदरची रोख रक्कम 7030 व 222 रुपये दि. 16/9/2021 रोजी भरली होती. तरीही माहिती देण्यात आली नव्हती. याबाबत पत्रकार घन:श्याम कडू यांनी उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नीलम गाडे यांच्याकडे दि. 30 मार्च 2022 रोजी लेखी तक्रार करून ग्रामसेवक पालकर यांच्या निलंबनाची मागणी केली. याबाबत वारंवार विचारणा करूनही आजतागायत कोणतीच कारवाई न करता संबंधित ग्रामसेवकाची पाठराखण केली जात असल्याचे दिसत आहे.
तरी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी याची चौकशी करून कामचुकार करणार्या ग्रामसेवक पालकर यांच्यासह त्यांना पाठीशी घालणार्या उरण पंचायत समितीच्या अधिकारी वर्गावर कडक कारवाई करण्याची मागणी पत्रकार घन:श्याम कडू यांनी केली आहे.