| उरण | प्रतिनिधी |
पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन व्हावे, झाडे, वृक्ष वेली इत्यादींचे महत्व येणाऱ्या भविष्यातील नवीन पिढीला समजावे, पर्यावरण विषयक जनजागृती व्हावे या अनुषंगाने उरणमधील विजय विकास सामाजिक संस्थेने ‘लोकनेते दि.बा. पाटील स्मृती वन’ उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्याचबरोबर खा. श्रीरंग बारणे, उरण व पनवलेचे आमदार आणि रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहाराद्वारे केली आहे.
रायगड व नवी मुंबई परिसरातील शेतकरी, कष्टकरी आणि आगरी समाजाचे नेतृत्व करणारे लोकनेते दि. बा. पाटील यांनी आयुष्यभर स्थानिक जनतेच्या हक्कांसाठी संघर्ष केला. त्यांच्या त्याग, नेतृत्व आणि कार्यामुळे संपूर्ण परिसरातील जनतेच्या मनात त्यांचे स्थान अत्यंत आदराचे आणि प्रेरणादायी आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर जमीन संपादित करण्यात आली. या विकासकामांच्या प्रक्रियेत त्या परिसरातील अनेक झाडे तोडली गेली. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसानही झाले आहे. या पार्श्वभूमीवर त्या परिसरात पुन्हा मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करून पर्यावरण संतुलन राखणे ही काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने विजय विकास सामाजिक संस्था, नवघर तसेच स्थानिक जनता आणि आगरी समाज यांची अशी ठाम मागणी आहे की, नवी मुंबई विमानतळ परिसरात विशेष वृक्षलागवड करून ‘लोकनेते दि. बा. पाटील स्मृती वन’ उभारण्यात यावे. या स्मृती वनामध्ये हिंदू संस्कृतीत पूजनीय आणि पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाची झाडे जसे वड, पिंपळ, औदुंबर, कडुलिंब, बेल इत्यादी मोठ्या प्रमाणावर लावण्यात यावीत, अशी मागणी विजय विकास संस्थेने केली आहे.






