। कराची । वृत्तसंस्था ।
सुरक्षिततेच्या कारणावरून भारतीय संघाने चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये येण्यास नकार दिला तर त्यांना परवानगी नाकारणार्या त्यांच्या केंद्र सरकारच्या लेखी पत्राचा दाखला आम्हाला द्यावा, अशी मागणी पाक क्रिकेट मंडळाने केली आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यात ही स्पर्धा नियोजित आहे आणि आम्हाला तयारी सुरू करण्यासाठी भारतीय संघाच्या समावेशाबाबतचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा, असेही पाक मंडळाचे म्हणणे आहे. येत्या 19 तारखेला कोलंबोत आयसीसीची वार्षिक परिषद होत आहे. त्यात भारताच्या समावेशाबाबत आणि भारताने पाकमध्ये खेळण्यास नकार दिला तर हायब्रिड मॉडेलवर चर्चा होणे अपेक्षित आहे. दोन देशात सामने खेळवावे लागले तर आयसीसीला अधिक खर्च करावा लागतो, हा मुद्दासुद्धा चर्चेत येऊ शकतो. भारतीय संघाला पाकमध्ये खेळण्यास त्यांचे सरकार परवानगी देत नसेल तर तसे पत्र आम्हाला किंवा आयसीसी दाखला म्हणून सादर करण्यात यावे. हा नवा मुद्दा पाक मंडळाकडून उपस्थित करण्यात आला आहे.
पाक मंडळाची लेखी पत्राची मागणी
