| कर्जत | वार्ताहर |
कर्जत-खालापूर तालुक्यात प्रसिद्ध असलेली धरणे व धबधबे ही मुंबई, पुणे शहरातील पर्यटकांची सहलीची पसंतीची ठिकाणे आहेत. पावसाळयात निसर्गाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी हे पर्यटक ह्या ठिकाणांना मोठया संख्येने दरवर्षी भेट देत असतात. पण प्रशासनाने गेल्या काही वर्षापासून सुरक्षेच्या नावाखाली सर्व धबधबे व धरणे ही पर्यटकांसाठी बंद केली गेली आहेत. खरे तर हा एक पर्यटनाचा भाग असून या निमित्ताने तालुक्यातील स्थानिक लोकांच्या व्यवसायास चालना मिळते व अनेकांना यातून काही प्रमाणात रोजगार प्राप्त होतो. त्यामुळे कर्जत-खालापूर तालुक्यातील धरणे व धबधब्यावर बंदी न घालण्यासंदर्भात आम आदमी पार्टीच्यावतीने प्रशासनास निवेदनाव्दारे विनंती करण्यात आली आहे. कर्जत, खालापूर तालुक्यातील धबधबे व धरण या ठिकाणी असणाऱ्या पर्यटनास चालना देताना सुरक्षा व्यवस्था तैनात करावी. काही मूठभर लोकांसाठी निसर्गाचा आनंद लुटणाऱ्या पर्यटकांचे नुकसान होऊ नये यासाठी योग्य तो विचारविनिमय करुन स्थानिक लोकांच्या रोजगारास चालना द्यावी, अशा विनंतीचे पत्र आम आदमी पार्टी खालापूर तालुका अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे आणि त्यांचे सहकारी यांनी कर्जतचे उपविभागीय अधिकारी अजित नैराळे व खालापूर तालुक्याचे तहसिलदार आयुब तांबोळी यांना देण्यात आले.