| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
मीटर कॅलिब्रेशन करण्यासाठी गेलेल्यांची प्रादेशिक परिवहन विभागाकडून लूट केली जात असल्याचा आरोप काही रिक्षाचालकांनी केला आहे. कॅलिब्रेशन करण्यासाठी गेलेल्यांकडून दंडाच्या रकमेसोबतच अतिरिक्त दीडशे रुपये उकळले जात असून, या रकमेची पावतीसुद्धा दिली जात नसल्याचा दावा रिक्षाचालकांनी दिली आहे. रिक्षा संघटनांना 22 डिसेंबरपासून भाडेवाढ करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने परवानगी दिली आहे. मात्र, याकरिता नव्या दराप्रमाणे मीटर कॅलिब्रेशन करण्याची अट प्रादेशिक परिवहन विभागाने ठेवली आहे.
याकरिता 15 जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मुदतीत मीटर कॅलिब्रेशन न करणार्यांना दर दिवशी 50 रुपये दंड आकरला जाणार होता. त्यामुळे सध्या प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयाबाहेर रिक्षाचालकांच्या मोठ्या रांगा सध्या लागल्या आहेत. याचाच फायदा उचलण्यासाठी सक्रिय झालेल्या प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकार्यांकडून दंडाच्या रकमेसोबत अतिरिक्त दीडशे रुपये वसूल केले जात असून, या रकमेची कोणतीही पावती रिक्षाचालकांना दिली जात नसल्याने रिक्षा चालक संताप व्यक्त करीत आहेत.
मीटर कॅलिब्रेशन करण्यासाठी गेलेल्या रिक्षा चालकांकडून दंडाच्या रकमेसोबत अतिरिक्त दीडशे रुपये वसूल केले जात आहेत. मात्र, या रकमेची पावती रिक्षा चालकांना दिली जात नाही. – आत्माराम म्हसकर, अध्यक्ष, स्थानिक प्रकल्पग्रस्थ संघटना, कामोठे-जुई
प्रादेशिक परिवहन विभागाकडून बिनापावती कोणतीही रक्कम स्वीकारली जात नाही. जर असा कोणताही प्रकार रिक्षाचालकांच्या निदर्शनास येत असेल, तर याबाबतची तक्रार करावी. याविरोधात कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे दंड आकरण्यासाठी कोणत्याही खासगी कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आलेली नाही. – अभय देशपांडे, पनवेल उपप्रादेशिक अधिकारी