मैदानी खेळ चालू करण्याची विविध क्रीडा संघटनाची मागणी

। उरण । वार्ताहर ।
जिल्ह्यातील मैदानी खेळ क्रिकेट, फुटबॉल, खोखो, बॅडमिंटन, कबड्डी खेळण्यास परवानगी मिळावी यासाठी विविध क्रीडा क्षेत्रातील संघटनानी आता राजकीय पुढारी नेते, आजी माजी लोकप्रतिनिधी यांची भेट घेण्यास सुरवात केली आहे. सर्वच राजकीय पक्षाचे नेते पुढारी, लोकप्रतिनिधी यांना निवेदन देऊन उरण, पनवेल तालुक्यासह जिल्ह्यात मैदानी खेळ सुरु करावी अशी मागणी क्रीडा संघटना, क्रीडा प्रेमीकडून केली जात आहे.
पनवेल, उरण, पेण, अलिबाग, कर्जत, खालापूर परिणामी जिल्हा आणि त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रमध्ये क्रिकेट, फुटबॉल, खोखो, बॅडमिंटन, कबड्डी आदी मैदानी खेळ मोठ्या प्रमाणात खेळले जातात. या खेळाच्या विविध स्पर्धाच्या माध्यमातून शेकडो हजारो नागरिकांना विविध प्रकारे रोजगार उपलब्ध होत असतो. मात्र कोरोनाच्या नियमामुळे मैदानी खेळावर बंदी आल्याने या खेळावर अवलंबून राहणार्‍या विविध घटकावर उपासमारीची वेळ आली आहे. खेळ खेळण्यासाठी लागणारे साहित्य टी शर्ट, ट्रॅक, पॅन्ट, बॅट, बॉल आदी साहित्य बनविणारे अनेक कारखाने जिल्ह्यात आहेत. त्यातील शेकडो कामगार रोजंदारीवर काम करत आहेत. जर हि मैदाने आणि खेळ बंद झाली तर त्यांना उपजीविका करणे खूपच कठीण जाईल.
खेळ खेळण्यासाठी लागणारे टी शर्ट, पॅन्ट, बॅट, बॉल, इतर साहित्याची विक्री करणारे अनेक दुकाने ओस पडतील. प्रत्येक दुकानात तीन चार माणसे असतात. अशी शेकडो लोकांची रोजगार बुडून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. खेळाच्या आणि स्पर्धेच्या माध्यमातून समालोचक, पंच, गुणलेखक, अपडेटर, लाईव्ह प्रक्षेपण वाहिनी अशा अनेक लोकांची कुटुंबे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे या खेळावर अवलंबून आहेत. अगदी पाण्याच्या बॉटल पासून ते चायनीज गाडी, वडापाव, टपरी, चाय दुकान ढाबा यांचाही रोजगार या खेळावर, स्पर्धावर अवलंबून आहे. मैदानी खेळ हे स्वतःला फिट ठेवण्यासाठी, स्वतःची एम्युनिटी पॉवर वाढविण्यासाठी मदत करत असतात. शिवाय या खेळावर अनेक लोकांची पोट भरत असल्याने सदर मैदानी खेळावर, मैदानावर विविध स्पर्धावर कोरोनामुळे बंदी आणू नये यासाठी विविध क्रीडा संघटना, संस्था, क्रीडा रसिक प्रेमी, चाहते यांनी उरण, पनवेल तालुक्यासह रायगड जिल्ह्यात मैदानी खेळ, स्पर्धा, मैदाने सुरु करावी अशी मागणी विविध राजकीय पक्षाचे पुढारी, नेते, लोकप्रतिनिधी यांच्याकडे केली आहे.विविध क्रीडा, संघटनांनी रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, शेतकरी कामगार पक्षाचे आमदार बळीराम पाटील, पनवेल महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे,खा. श्रीरंग बारणे, बबन पाटील, महेंद्र घरत यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांना निवेदन देऊन उरण पनवेल तालुक्यासह रायगड जिल्ह्यात मैदानी खेळ सुरु करण्याची मागणी केली आहे.

Exit mobile version