| नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्याच्या ठाणे जिल्ह्यालगत असलेल्या भागातील गुरांची चोरी करण्याचे प्रकार वाढले आहे. शेतीसाठी लागणाऱ्या बैलांची शेती करण्यासाठी आवश्यकता असते. पण, याच पशुधनाची चोरी होत आहे. ती रोखण्यासाठी पोलीस प्रशासनांनी चोरी करणाऱ्या चोरांना पकडून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी आदिवासी ठाकूर कातकरी संघटना यांच्याकडून कर्जत आणि नेरळ पोलीस ठाणे यांना निवेदन देऊन केली आहे.
तालुक्यात बहुल आदिवासी भाग आहे, त्यामध्ये आदिवासी समाज मोलमजुरी करून शेती हा प्रमुख व्यवसाय करतो. शेती व्यवसाय करत असताना गाय, बैल, शेळयांची आवश्यकता असते. बैलाची गरज नांगरणीसाठी गरजेची असते म्हणून आदिवासी बांधवांच्या प्रत्येक घरी विविध प्रकाराची मुकी जनावरे पाळली जातात. परंतु काही महिन्यांपासून ती मुकी जनावरे अज्ञात व्यक्तींकडून चोरून नेली जात आहेत. त्यामुळे आदिवासी समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जर जनावरे चोरून नेली तर शेतीची नांगरणी, शेतीची कामे कशी करणार, अशी चर्चा आदिवासी समाजामध्ये होत आहे. आदिवासी समाज बांधवांनी मुकी जनावरे चोरून नेण्याच्या तक्रारी कर्जत, नेरळ येथील पोलीस ठाण्यात नोंदवल्या आहेत.
तरीही मुकी जनावरे चोरून नेण्याच्या घटना घडत आहेत. प्रामुख्याने कशेळे, पिंगळस, खांदन, शिलार, मार्गाची वाडी, बोरीवली, काठेवाडी डामसेवाडी, खांडस, ओलमन या विभागात मोठ्या प्रमाणात मुक्या जनावरांच्या चोऱ्या होत आहेत. त्यामुळे आदिवासी बांधवांनी समाज संघटनेच्या निदर्शनात आणून दिले असता आदिवासी समाज संघटनेने पोलीस ठाण्यात मुकी जनावरे चोरून नेणाऱ्या चोरांना तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निवेदन पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आले. याप्रसंगी माजी समाज कल्याण सभापती नारायण डामसे, आदिवासी समाज संघटना कर्जत अध्यक्ष परशुराम दरवडा, सचिव भगवान भगत, उपाध्यक्ष मंगळ केवारी, पांडूरंग पुजारी, गणपत सांबरी, काशिनाथ पादीर, अर्जुन केवारी, महेश निरगुडा आदी कार्यकर्ते उपस्थित होते.