माथेरानमधील महिला दक्षता समिती आक्रमक
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान शहर पर्यटनस्थळ असल्याने राज्याच्या विविध भागातून तसेच परराज्यातूनदेखील पर्यटक येत असतात. मात्र, त्यातील काही पर्यटक हे शहरातील सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करतात आणि त्यामुळे महिलांना शरमेने मान खाली घालावी लागते. त्यामुळे अशा पर्यटकांना पोलिसी खाक्या दाखवून शिस्त लावण्याची मागणी महिला दक्षता समितीच्या बैठकीत करण्यात आली. दरम्यान, माथेरान पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनिल सोनोने यांनी रात्रीच्या वेळी पोलिसांचा राऊंड शहरात सुरू राहील, असे आश्वासन दिले आहे.
माथेरान पोलीस ठाणे अंतर्गत महिला दक्षता समितीची नियुक्ती आणि पहिली सभा पोलीस ठाणे येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी माथेरान पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आणि प्रभारी अधिकारी अनिल सोनोने यांनी नवनिर्वाचित महिला दक्षता समिती सदस्यांचे स्वागत केले. माथेरान पोलीस ठाणे दक्षता समितीमध्ये सामाजिक कार्यकर्त्या रेखा चौधरी, वर्षा शिंदे, सोनम दाभेकर, कीर्ती मोरे, सुहासिनी शिंदे, स्वाती कुमार यांची निवड करण्यात आली आहे. या बैठकीला महिला पोलीस कर्मचारी पूनम ठाकरे, निलिमा जाधव आणि स्थानिक गुप्तचर पोलीस दामोदर खतेले हे उपस्थित होते. या बैठकीत महिला दक्षता समितीच्या सदस्यांनी अनेक विषय बैठकीत मांडले. त्यात प्रामुख्याने शहरात येणारे पर्यटक यांच्याकडून सार्वजनिक ठिकाणी केले जाणारे अश्लील चाळे थांबविण्यासाठी काही उपाययोजना करण्याच्या सूचना वर्षा शिंदे यांनी केल्या. त्यात सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करू नयेत, असे फलक आणि पोलिसांचा गस्त सतत सुरू राहायला हवी, अशी मागणी केली. महिला वर्ग मोठ्या प्रमाणात शहरात पर्यटनासाठी येत असतो आणि दुसरीकडे स्थानिक रहिवाशांनादेखील तरुण-तरुणी यांच्या अश्लील चाळ्यांमुळे मान खाली घालावी लागते, अशी तक्रार शिंदे यांनी केली.
महिला दक्षता समितीच्या सदस्या रेखा चौधरी यांनी शहरात गणेशोत्सव काळात मिरवणुकी वरील कडक नियम शिथिल करण्याची मागणी केली. शहरात गणेशमूर्ती फार अधिक नसतात आणि त्यामुळे निर्बंध लागू करण्याऐवजी नियमावली बनवून गणेशभक्तांना आवाहन करून नियम पाळायला लावा, अशी सूचना केली. तसेच शहरातील कायदा सुव्यवस्था याबाबत पोलीस प्रशासन कडक पावले उचलावी जेणेकरून शहरात पर्यटकांकडून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, अशी अपेक्षा सुहासिनी शिंदे यांनी व्यक्त केली.






