| माणगाव | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गाचे वर्षानुवर्षे रखडलेले काम, निकृष्ट दर्जाचे रस्ते, वाढत जाणारे अपघात आणि प्रशासनाचे उदासीन धोरण या सर्वांचा संताप पुन्हा एकदा रस्त्यावर उसळला. जनआक्रोश समितीच्यावतीने शनिवारी (दि.6) माणगाव येथील लोणेरे पुलावरून तिरडी यात्रेची घोषणा करण्यात आली होती. शासन, प्रशासन आणि ठेकेदारांवर दबाव वाढावा यासाठी आयोजित केलेल्या या आंदोलनाला स्थानिक नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
माणगावातील पहेल-खांडपाले बायपासचे काम अपूर्णावस्थेत असल्यामुळे या ठिकाणी भीषण अपघाताची शक्यता उद्भवली आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवासी वर्गात प्रचंड भीती निर्माण झाली आहे. खरंतर चारही दिशेने वाहतूक सुरू व्हायला हवी होती; परंतु, अद्याप एकाच बाजूचा रस्ता सुरू असून बाकी तीन बाजूंचे काम अपूर्णावस्थेत आहे. परिणामी शाळाकॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना, मोटारसायकल स्वारांना, रिक्षाचालकांना महामार्ग ओलांडताना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. ग्रामस्थांनी याला ‘दररोजचा मृत्यूमार्ग’ असे वर्णन करत संताप व्यक्त केला. यादरम्यान, जन आक्रोश समितीच्यावतीने शासन, प्रशासन आणि ठेकेदारांवर दबाव वाढावा यासाठी शनिवारी माणगाव येथील लोणेरे पुलावरून तिरडी यात्रेची घोषणा करण्यात आली होती. ही तिरडी आमच्या वेदनेची निशाणी आहे, असा आक्रोश स्थानिकांमधून होत होता. या आंदोलनात पहेल व खांडपाले येथील अनेक नागरिक पुढाकाराने सहभागी झाले होते. या नागरिकांनी एकमुखाने बायपासचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे.
तिरडी आंदोलन; बायपासचे काम पूर्ण करण्याची मागणी
