| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिका हद्दीतील सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरी व त्यांच्या वारसांना महानगरपालिकेची ए-2 श्रेणीतील कंत्राटे देण्याची मागणी प्रकल्पग्रस्त ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष शशिकांत डोंगरे व इतर पधाधिकाऱ्यानी महापौर नितीन पाटील तसेच विरोधी पक्ष नेते अरविंद म्हात्रे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, प्रकल्पग्रस्त शेतकरी व त्यांचे वारस आमची जमीन सिडको महाराष्ट्र शासन नवी मुंबई प्रकल्पाकरता संपादित झालेली आहे. उदरनिर्वाहकरता आमच्याकडे त्यावेळी कोणतेही साधन नव्हते म्हणून कालांतराने सिडको प्रशासनाने स्थानिक प्रकल्पग्रस्तकरिता एक जी.आर. काढून ए-2 श्रेणीतील कंत्राटी कामे प्रकल्पग्रस्ताकरिता देण्याचे सुरू केले. गेले 30-50 वर्षे ही कामे प्रकल्पग्रस्त शेतकरी व त्यांचे वारस यांना व्यवस्थितरितीने पूर्ण केलेली आहेत. तसेच कामासंबंधी कोणतीही तक्रार महामंडळाकडून करण्यात आलेली नाही, परंतु सन 2016 मध्ये पनवेल महानगर पालिकेची निर्मिती झाल्यानंतर सिडकोमधील बहुतेक विभाग महानगर पालिकेत वर्ग करण्यात आली. त्यामुळे आम्हा प्रकल्पग्रस्तांना मिळणारी ए-2 ची कंत्राटी कामे बंद झाल्याने आमचे उपजिवीकेचे साधन बंद झाली आहेत. तरी कृपया आपणास नम्र निवेदन आहे की, आम्हा प्रकल्पग्रस्तांना ए-2 श्रेणीतील कामे सिडको प्रमाणे पुर्ववत चालू करावी. तसेच आम्हांला इतकी वर्षे विविध कामे करत असल्यामुळे कामाच अनुभव आहे. तरी आपणास नम्र विनंती आहे की, आम्हा प्रकल्पग्रस्तांना ए-2 श्रेणीतील कंत्राटी काम नडकोप्रमाणे पुर्ववत मिळावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी प्रकल्पग्रस्त ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष शशिकांत डोंगरे, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, नगरसेवक हरिश केणी, प्रकाश म्हात्रे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कंत्राटे देण्याची मागणी
