| माथेरान | वार्ताहर |
सुप्रीम कोर्टाचे आदेश प्राप्त होताच माथेरान नगरपालिकेने सात ई रिक्षा (दि. 26) डिसेंबरपासून सुरू केल्या आहेत. मात्र, तीनशेहून अधिक विद्यार्थी, स्थानिक रहिवाशी व चार ते पाच हजार पर्यटक याना ई-रिक्षांची सेवा फारच अपुरी पडत आहे. त्यामुळे विद्यार्थी वेळेत शाळेत पोहचत नाहीत इतर लोकांना तासनतास ई-रिक्षासाठी प्रतीक्षा करावी लागते. अनेकदा वादावादीपर्यंत विषय जातो, त्यामुळे ई रिक्षांची संख्या वाढवणे हाच पर्याय आहे. यासाठी सुहासिनी शिंदे व प्रतिभा घावरे, गीता जाधव, जयश्री कदम, शैला पार्टे, मेघा कोतवाल, जयश्री मालुसरे यांनी मुख्याधिकारी राहुल इंगळे यांची भेट घेऊन मागणी केली.
सात ई-रिक्षा या तीन महिन्यांच्या पायलट प्रोजेक्टसाठी वापरण्यात आल्या होत्या. पायलट प्रोजेक्टचा उद्देश केवळ कोणत्या मॉडेलच्या ई-रिक्षा धावू शकतात याची चाचणी करणे हा उद्देश होता तो सफल झाल्याचा अहवाल सादर केला आहे. त्यामुळे तात्काळ संख्या वाढवणे आवश्यक आहे.
(दि. 10) जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टाने ई-रिक्षा फक्त परवानाधारक हात रिक्षा चालकांना देण्याचे आदेश दिले आहेत. ई-रिक्षाचा मार्ग निश्चित करणे तसेच ई-रिक्षांची संख्या सुद्धा ठरवण्याचे आदेश सनियंत्रण समितीला दिले आहेत तरी देखील ई-रिक्षा खासगी ठेकेदारच चालवीत आहे, ही बाब संतापजनक आहे. ई-रिक्षासुरू झाल्याने पर्यटकांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे प्रतिभा घावरे यांनी सांगितले.
वाहतूक हा देशाच्या राज्य घटनेने प्रत्येकाला दिलेला महत्वपूर्ण असा अधिकार आहे ई रिक्षामुळे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रहिवाशी व रात्री अपरात्री येणाऱ्या पर्यटकांना फायदेशीर ठरत आहे त्यामुळे सर्वांचीच पायपीट वाचत आहे
सुहासिनी शिंदे
