| पाली | प्रतिनिधी |
पाली-खोपोली-वाकण महामार्गावर सातत्याने घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर तातडीने गतिरोधक बसविण्याची मागणी ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
या धोकादायक महामार्गावर अनेक गंभीर अपघात घडून नागरिकांचे बळी गेले असून, काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्यास रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा पँथर सेनेने दिला आहे. या मागणीसंदर्भात रायगड जिल्हाध्यक्ष नरेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पँथर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुधागड तहसीलदार उत्तम कुंभार यांना निवेदन सादर केले. या निवेदनाची प्रत रायगड जिल्हाधिकारी तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळालाही पाठविण्यात आली आहे. यावेळी सुधागड तालुकाध्यक्ष मारुती गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते सेवक जाधव, आकाश कांबळे आणि निशांत पवार उपस्थित होते. काही वर्षांपूर्वी पाली- खोपोली-वाकण महामार्गाचे नूतनीकरण करण्यात आले असून, पाली ते खोपोली या टप्प्यावर काँक्रिटीकरण झाले आहे. रस्त्यावरील वळणे व चढ-उतार कमी झाल्यामुळे वाहनांची वेगमर्यादा वाढली आहे. परिणामी या मार्गावर अपघातांचे प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. विशेषतः गावांच्या हद्दीत, शाळा, बाजारपेठा व वर्दळीच्या ठिकाणी वेगावर कोणतेही नियंत्रण नसल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर अपघातांना आळा घालण्यासाठी अपघातप्रवण क्षेत्रांमध्ये गतिरोधक बसविणे, वेगमर्यादा दर्शविणारे सूचना फलक उभारणे आणि आवश्यक ठिकाणी सुरक्षात्मक उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याचे पँथर सेनेने निवेदनात नमूद केले आहे.







