| तळा | प्रतिनिधी |
तळा शहरातील तहसील कार्यालयाजवळ असलेल्या धरणाची पाणी पातळी अतिशय खालावली असून, या धरणातील गाल काढण्याची आवश्यकता असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे. याच धरणा शेजारी नगरपंचायतीच्या मालकीची जागा असून, या ठिकाणी मारण्यात आलेल्या बोरवेल मधून अर्ध्या शहराला पाणीपुरवठा केला जातो. मात्र, यावर्षी पावसाने दडी मारल्याने या धरणाचे पाणी आटले आहे. परिणामी येथील बोरवेलचे पाणी देखील गढूळ स्वरूपात येत आहे. त्यामुळे सध्या ही लाईन बंद ठेवण्यात आली असून, संपूर्ण शहराला आंबेळी लाईन वरून पाणी पुरवठा केला जात आहे. पूर्वी पाऊस सुरू होईपर्यंत सदर धरणात पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध असायचे ज्याचा उपयोग येथील आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना व्हायचा. मात्र, गेल्या कित्येक वर्षांपासून या धरणातील गाळ काढला गेला नसल्याने धरणातील खोली मातीने भरली जाऊन संपूर्ण धरणात मातीचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी पाण्याची साठवणूक होत नसल्याने धरणातील पाणी साठा कमी कमी होत जात आहे. सध्या पावसाचे आगमन लांबणीवर गेल्याने संबंधित प्रशासनाने धरणातील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केल्यास धरणाची खोली वाढून धरणात जास्त प्रमाणात पाण्याची साठवणूक होईल व दरवर्षी मे ते जून महिन्यापर्यंत धरणात मुबलक प्रमाणात पाणी शिल्लक राहिल्याने पाणी टंचाईवर मात करता येईल असे जाणकारांनी मत व्यक्त केले आहे. प्रशासनाने धरणातील गाळ काढण्याच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
तळा धरणातील गाळ काढण्याची मागणी
