| उरण | प्रतिनिधी |
उलवे नोडमधील पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते सचिन राजे येरुणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिडकोचे ॲडिशनल चीफ इंजीनियर पि.एस. फुलारी यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, उलवे मधील वाढती लोक वस्ती, लोकसंख्या पाहता उलवे नोडमध्ये खूप कमी प्रमाणात पाणी येत आहे. त्यामुळे रहिवाशांना मोठ्या पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. येथे मोठंमोठे टॉवर उभारले गेले आहेत. त्यामुळे त्यांना जास्त प्रमाणात पाणी जाते. त्यामुळे येथील छोट्या सोसायटीला पुरेसे पाणी मिळत नाही. तर, काही सोसायट्यांना अजिबातच पाणी मिळत नाही. त्यांना शासनामार्फत टँकरने पाणी पुरवले जाते. मात्र, तो ही टँकर नियमित येत नाही. तसेच, जावळे गाव हा पूर्ण सिडकोच्या अंतर्गत येतो आणि हा पट्टा जास्त प्रमाणात टेकडीचा भाग आहे. त्यामुळे त्या भागात देखील पाणी वर चढत नाही. तसेच, 15 ते 17 या सेक्टरमध्ये पाईप लाईन फिरून जात असल्यामुळे छोट्या सोसायटीपर्यंत पाणी पोहोचत नाही. बामणडोंगरी स्टेशन समोरील बिल्डिंग मध्येही पाणीपुरवठा होत नाही. या सर्व समस्या सुटाव्यात म्हणून सामाजिक कार्यकर्ते सचिन राजे येरुणकर यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रकांत बाकळकर, गजानन जाधव, साई पैकडे, शशिकांत कांबळे आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी सिडकोचे ॲडिशनल चीफ इंजीनियर पि.एस. फुलारी यांची भेट घेऊन यावर काही उपाय योजना सुचविले आहेत. त्या उपाययोजनाची अंमलबजावणी केली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे.