। श्रीवर्धन । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यात सध्या बॉक्साईट मायनिंग आणि जेट्टीच्या कामासाठी अवजड डंपर दिवस-रात्र मालवाहतूक करीत असतात. गेल्या काही महिन्यांत बॉक्साईट वाहतूक करणार्या डंपरमुळे अपघात घडले आहेत. जेट्टीच्या कामासाठी दगड वाहतूक करणार्या डंपरने घरांना तसेच महावितरण कंपनीच्या खांबांना धडक देण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या लग्न सराईचे दिवस सुरू असून श्रीवर्धन तालुक्यात पै-पाहुणे येण्याचे प्रमाण वाढते आहे. लग्न सराईच्या दिवसांत मालवाहतूक करणार्या डंपरमुळे दुर्घटना घडू नये, त्यासाठी काही दिवस डंपर वाहतूक बंद ठेवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
श्रीवर्धन तालुक्यात बॉक्साईट खनिज आणि बांधकामासाठी लागणार्या दगड खाणी मुबलक प्रमाणात आहेत. दोन ते तीन वर्षांपासून तालुक्यातील बॉक्साईट मायनिंग संख्या वाढली आहे. दररोज तालुक्यातून 70 ते 80 डंपरमधून बॉक्साईटची वाहतूक केली जाते. अनेक ठिकाणी तीव्र उतार व अवघड वळणे असताना देखील डंपर चालक आपल्या ताब्यातील वाहनाचा वेग कमी न करता तीव्र उतार व घाट रस्त्यावरून वेगाने वाहन आणतात. अनेक रस्ते अरुंद असल्याने समोरून भरधाव वेगाने येणार्या डंपरला बाजू देताना इतर वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. काही महिन्यांपूर्वी हरिहरेश्वर येथील एका तरुणाला बॉक्साईट वाहतूक करणार्या डंपरने चिरडले होते. मध्यंतरी वेगाने उतारावरून जाणार्या डंपर चालकाचे आपल्या वाहनावरील ताबा सुटल्याने दोन भीषण अपघात झाले आहेत. त्यात एका अपघातात चालकाचा केबीनमध्ये चिरडून मृत्यू झाला होता. त्यामुळे लग्न सराई हंगाम होईपर्यंत डंपर वाहतूक बंद ठेवावी, असे निवेदन तालुक्यातील ग्रामस्थांनी श्रीवर्धन पोलीस ठाण्यात दिले आहे.