मागण्या मान्य, कोल्हारे ग्राप सदस्यांचे उपोषण मागे

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
विविध मागण्यांसाठी रायगड जिल्हा परिषदेच्या येथील मुख्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसलेल्या कोल्हारे ग्रामपंचायत सदस्य विजय रामचंद्र हजारे यांनी आज पाचव्या दिवशी सर्व मागण्या मान्य झाल्यानंतर आपले उपोषण मागे घेतले. जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बारदेशकर यांच्या हस्ते शहाळ्याचे पाणी देऊन हे उपोषण मागे घेण्यात आले.
कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायतचे सदस्य असलेले विजय हजारे यांनी ग्रामपंचायत हद्दीतील प्राधिकरण क्षेत्रात सुरू असणारी आणि पूर्ण झालेली बांधकामे हटविण्यात यावी यासाठी यापूर्वी चार वेळा उपोषण केले आहे. मात्र न्याय मिळत नसल्याने आणि सातत्याने प्रशासनाकडून अर्धवट माहिती पुरवली जात असल्याने त्यांनी 19 मे पासून उपोषण सुरू केले. नेरळ-कळंब राज्य महामार्ग, नेरळ-कशेळे राज्य महामार्ग, लोभ्याची वाडी पिंपळोली-नेरळ प्रस्तावित जिल्हा मार्गावर अनधिकृत खोदकाम करून जलवाहिनी टाकण्यात आली आहे. कोल्हारे मार्गालगत झालेली आणि सुरू असलेली अनधिकृत बांधकामे काढून टाकण्यात यावी. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक वेळा पत्रव्यवहार करून माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे कोल्हारे-बोपेले-धामोते हजारे नगर, रामकृष्ण बोपेले साईनगर, कोल्हारे चार फाटा, उमनागर धामोते श्री साई मंदिर परिसरासाठी नवीन पाणी पुरवठा योजना व्हावी यासाठी रायगड जिल्हा परिषदकडे अनेकदा पत्रव्यवहार केला असून, ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यालगत संरक्षण भिंत बांधणे आदी विकास कामे व्हावी यासाठी यापूर्वी विजय हजारे यांनी आंदोलने केली होती.
आज उपोषणाच्या पाचव्या दिवशी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे कार्यकारी अभियंता एस पी वेंगुर्लेकर यांनी लेखी पत्र देत कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीमधील गावासाठी 11 कोटी 67 लाख खर्चाची नळपाणी योजना मंजूर झाली असल्याचे स्पष्ट केले. तर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्त्याबाबत उपअभियंता कार्यालयाने रस्ते खोदून जलवाहिनी 15 दिवसात कार्यवाही करण्याचे लेखी आश्‍वासन दिले आहे. त्याचप्रमाणे रायगड जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भारदेशकर यांनी देखील लेखी आश्‍वासन दिले आहे. त्यामुळे आपल्या सर्व 11 मागण्या पूर्ण झाल्याने विजय हजारे यांनी आपले उपोषण स्थगित केले आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बारदेशकर यांच्या हस्ते शहाळ्याचे पाणी देऊन उपोषण मागे घेतले. यावेळी अभियंता समीर अधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version