कोकणातील कोळीवाड्यांचे सीमांकन करा; आ.रमेश पाटील यांची मागणी

। मुंबई । प्रतिनिधी ।
कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आ.रमेश पाटील यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन 2022 मध्ये मुंबईतील उर्वरित कोळीवाड्यांचे तसेच कोकण किनारपट्टीवरील कोळीवाड्यांचे सीमांकन करण्यासंदर्भातील प्रश्‍न उपस्थित केला.
गेल्या अनेक वर्षापासून कोळीवाड्यांचे सीमांकन करण्याचा प्रश्‍न प्रलंबितच आहे. मुंबई ही कोळ्यांची आहे. पिढ्यान्पिढ्या येथील कोळी बांधव मुंबईतील तसेच कोकण किनारपट्टीवरील सर्वच कोळीवाड्यात राहत असून ते स्थानिक भूमिपुत्र आहेत. या कोळीवाड्यांचे तसेच गावठाणांचे सीमांकन करून स्थानिक भूमिपुत्रांना त्यांची प्रॉपर्टी कार्ड देणे गरजेचे आहे. कारण प्रॉपर्टी कार्ड नसल्यामुळे या मूळ रहिवाशांना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे मुंबईतील तसेच 720 किलोमीटर कोकण किनारपट्टीवरील स्थानिक कोळी बांधव आ.रमेश. पाटील यांच्याकडे कोळीवाडे व गावठाणांचे सीमांकन होण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी करत आहेत. त्यामुळे या स्थानिक भूमिपुत्रांच्या मागणीनुसार आ.रमेश. पाटील अनेक वर्षांपासून सीमांकन होण्यासाठी पाठपुरावा करीत आहेत. त्याच संदर्भात त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुंबईतील व कोकण किनारपट्टीवरील कोळीवाड्यांचे सीमांकन करण्याबाबतचा प्रश्‍न उपस्थित करून संपूर्ण सभागृहाचे लक्ष वेधले.

Exit mobile version