आंबेडकरांविषयी आक्षेपार्ह पोस्ट

नेरळ पोलिसात युवतीवर गुन्हा

नेरळ | प्रतिनिधी |
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबतीत आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवरुन टाकल्याने नेरळनजीक कोदिवले येथील एका युवतीवर नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे .यावरुन रविवारी येथील वातावरण कमालीचे तंग बनले होते.
या तरुणीने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून 24 जून 2022 रोजी भारतरत्न आणि घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्या पोस्टबद्दल 30 जुलै रोजी आंबेडकरी जनतेला माहिती झाल्यानंतर त्या पोस्टचे स्क्रीन शॉर्ट रायगड जिल्ह्यात व्हायरल झाले. त्यामुळे भावना दुखावलेल्या कर्जत तालुक्यातील आंबेडकरी चळवळीमधील कार्यकर्त्यांनी 30जुलै रोजी नेरळ तसेच कर्जत पोलीस ठाणे गाठले.
पोस्ट करणारी तरुणी ही नेरळ परिसरातील असल्याने तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी शेकडो आंबेडकरी अनुयायी पोलीस ठाण्यात एकत्र आले होते. मारुती गायकवाड, राहुल डाळिंबकर, धर्मानंद गायकवाड, धर्मेंद्र मोरे, अ‍ॅड. उत्तम गायकवाड, अरविंद मोरे, सुमित साबळे आदींनी गुन्हा दाखल करण्यासाठी ठाण मांडले डिकसळच्या किशोर गायकवाड यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दिली. त्यावेळी नेरळ पोलीस ठाणे बाहेर 400 हून अधिक लोकांची गर्दी जमली होती.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कर्जतचे पोलीस उपाधिक्षक विजय लगारे यांनी नेरळ पोलीस ठाणे गाठून प्रकरण समजून घेतले. त्यानंतर सदर तरुणीवर अट्रोसिटी क्ट नुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश नेरळ पोलीस निरीक्षक राजेंद्र तेंडुलकर यांना दिले. अ‍ॅट्रोसीटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे भादवी कलम 295अ, 153अ तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबधक अधिनियम 1989चे कलम 3 (1) व्ही यानुसार गुन्हा दाखल असून पोलीस उपअधीक्षक विजय लगारे अधिक तपास करीत आहेत.तर कर्जत पोलीस ठाणे येथे देखील याच प्रकारावरून तक्रार देण्यात आली आहे.

Exit mobile version