| माणगाव | प्रतिनिधी |
श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात मला कमी मिळालेले मतदान हा ईव्हीएम घोटाळा असल्याचा आरोप मतदारसंघातील बळीराज सेनेचे उमेदवार कृष्णा कोबनाक यांनी केला आहे. बांधवांनो आतातरी जागे व्हा, लोकशाही धोक्यात आली असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाची सार्वत्रिक निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी होऊन या निवडणुकीचा 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात आला. या निकालावर आक्षेप घेत बळीराज सेनेचे उपाध्यक्ष व मतदारसंघातील उमेदवार कृष्णा कोबनाक यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, मी गेली 37 वर्षे वविध सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असून, या माध्यमातून असंख्य पदाधिकारी, मित्र, समाज व हितचिंतक माझ्या पाठीशी असूनदेखील या मतदारसंघातील श्रीवर्धन, म्हसळा, रोहा, तळा, माणगाव या पाच तालुक्यांतून फक्त 490 मतदान मला मिळते, हा ईव्हीएम घोटाळा नाही का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. बांधवांनो आतातरी जागे व्हा, लोकशाही धोक्यात आली आहे, असे सांगत समस्त जनतेला जागरूक राहण्याचा सल्ला कोबनाक यांनी दिला आहे.







