| म्हसळा | वार्ताहर |
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे न्यू इंग्लिश स्कूल आणि जुनिअर कॉलेज म्हसळा येथे शनिवारी (दि. 3) आनंदादाई उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये चार विद्यार्थिनी आणि सहा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. लोकशाही पद्धतीच्या प्रणालीचा वापर करून दहाही प्रतिनिधींनी आपापले विचार विद्यार्थ्यांसमोर मांडून मत देण्याची विनंती केली. वर्गात जाऊन आपला प्रचार केला. उमेदवारांनी वर्गाच्या शिस्त व प्रगतीसाठी काय, काय करणार यांची आश्वासने दिली.
निवडणूक प्रक्रियेप्रमाणे निवडणूक अधिकारी म्हणून एन.एम. गर्जे व एच.बी. मोरे यांनी उमेदवारांना चिन्हाचे वाटप केले. मतदानासाठीच्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर गुप्त मतदान पद्धतीने मतदान घेण्यात आले. लगेचच मतमोजणी करून विजयी उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष म्हणून सिद्धी मोहिते, मतदान अधिकारी अनुक्रमे श्रेयश कोठावळे, आर्यन कांबळे, हितेश कांबळे व आदित्य गव्हाणे यांनी काम पाहिले. निवडून आलेले विद्यार्थी प्रतिनिधी अनुराग येलवे आणि विद्यार्थिनी प्रतिनिधी सलोनी जयस्वाल यांचे विद्यालयाचे प्र. प्राचार्य एम.ए. शेख आणि सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले. विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री. शेख यांनी विद्यार्थी प्रतिनिधींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी पर्यवेक्षक एन.एस. गायकवाड, ई.सी. पाटील, यू.के. खोकले, आय.बी. तडवी, ए.पी. हाके, एस.ए. शिर्के, एन.एस. गवळी, एस.ए. वसावे, एल.पी. सहारे, प्रसिद्धी विभाग प्रमुख व्ही.के. कामडी, संतोष जंगम, देवमण घावट आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी सहभागी होते.