मोदींविरोधात लोकशाहीचा बॉम्ब फुटणार: उद्धव ठाकरे

देशात इंडिया आघाडीचे सरकार येणार

| रायगड | खास प्रतिनिधी |

हुकूमशाहा मोदींविरोधात देशातील जनतेमध्ये तीव्र संतापाची लाट आहे. त्यांच्याविरोधात लोकशाहीचा बॉम्ब फुटणार असल्याने इंडिया आघाडीची सत्ता येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. अलिबाग येथील समुद्रकिनारी असणाऱ्या जेएसएमच्या मैदानावर इंडिया आघाडीची सभा रविवारी (दि.5) पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. रायगड लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे अनंत गीते यांना प्रचंड मताधिक्क्यांनी निवडून आणा, असे आवाहन त्यांनी रायगडच्या मतदारांना केले. तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराला रविवारी पूर्ण विराम मिळाला.


देशातील मोदी सरकारची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरु आहे. त्यांना वेळीच रोखणे गरजेचे आहे. एकाच पक्षाचे सरकार आले तर काय होते, हे देशातील जनतेने गेल्या दहा वर्षांत भोगले आहे. देशाला स्थिर देण्याची धमक फक्त इंडिया आघाडीतील घटक पक्षांमध्येच असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. रायगडकरांनी निसर्ग आणि तोक्ते चक्रीवादळाचा सामना केला आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की, तटकरेंसारख्या फडफडणाऱ्या वक्रीवादळाचा सामना तुम्ही सहज करु शकता. या निवडणुकीतून त्यांना कायमचे हद्दपार करा, असे आवाहन ठाकरे यांनी केले. देशातील राजकारणाची आयपीएलसारखी अवस्था झाली आहे. त्यामध्ये खेळाडूंचा लिलाव करुन खरेदी केली जाते. त्याचप्रमाणे आता राजकारणातील वक्तींची बोली लावून त्यांना लिलावात विकत घेतले जात आहे, असा घणाघात ठाकरे यांनी केला. शिवाजी महाराजांनी या रायगडच्या मातीचे ऋण ओळखले असेल म्हणूनच त्यांनी आपल्या स्वराज्याच्या राजधानीसाठी रायगडची निवड केली. शूर आम्ही वंदितो, असे बोलले जाते. मात्र, भाजपामध्ये चोर आम्ही वंदितो, असा प्रकार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. रायगडाला आता जाग आली आहे. त्यामुळे तटकरेंचा पराभव निश्चित असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. मोदी सरकारने आतापर्यंत देशातील जनतेची महागाई, बेरोजगारी, शेतीमालाला हमीभाव अशा विविध प्रश्नी फसवणूक केली आहे. मोदींची गॅरंटीही खोटी आहे. इंडिया आघाडीच्या पाठीशी आमची माय-बाप जनता आहे. त्यामुळे आमच्याकडे जनतेची गॅरंटी असल्याने आम्हाला अन्य कोणाची गॅरंटी नको, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

आम्ही कधीच हिंदूत्व सोडले नाही. आमचे हिंदूत्व हे सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन जाणारे आहे. भाजपा हे जाती-धर्मामध्ये विष कालवत असून, त्यांचे हिंदुत्व हे बेगडी आहे. त्यांनी हिंदुत्वाच्या नावावर देशात नंगानाच चालवला आहे, असे टीकास्त्र ठाकरे यांनी सोडले. देशात दोन टप्प्यात पार पडलेल्या मतदानानंतर भाजपाला निवडणूक जड जात आहे, असे चित्र दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या चारशे पारचा नारा आता मागे पडला आहे. त्यांनी महागाई, बेरोजगारी, 15 लाख रुपये देणार होते. त्यावर बोलावे; परंतु ते यावर बोलणार नाहीत. आधीची भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत माझ्या मनात आत्मीयता आहे, मात्र मोदी-शहांकडे पाहून तसे वाटत नाही, असा टोला त्यांनी लगावला. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला. हे भाजपाला मान्य नाही. याच कारणांनी ते संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. इंडिया आघाडी संविधान कदापि बदलू देणार नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

निवडणूक रोख्यांमार्फत तुम्ही हजारो कोटी रुपये जमा केलेत. मात्र, देशातील आणि राज्यातील जनताच आमची संपत्ती (निवडणूक रोखे) आहे. तुमच्याकडे काळा पैसा आणि आमच्याकडे असणाऱ्या संपत्तीचा रंग भगवा आहे, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. देशाभरातील इंडिया आघाडीतील नेत्यांना, त्यांच्या नातेवाईकांना ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स अशा यंत्रणांची भीती दाखवून त्यांना विनाकारण तुरुंगात डांबले जात आहे. भ्रष्टाचार करुन तुमच्या पक्षात आल्यावर ते शुद्ध होतात. तटकरेंविरोधात बैलगाडी भरुन भ्रष्टाचाराचे पुरावे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणले होते. आता त्याच तटकरेंना त्यांनी मांडीवर घेतले आहे. विनाशकारी प्रकल्प आमच्या कोकणात आणू पाहता आणि चांगले प्रकल्प गुजरातला पळवता. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही. आमचे सरकार आल्यावर गेलेले वैभव परत आणू, असा विश्वास ठाकरे यांनी उपस्थितांना दिला. फडणवीस बोलतात, मोंदीनी लस शोधली म्हणून जगातील जनतेला टोचता आली आणि त्यांचे जीव वाचले. असे असेल तर मग आपले शास्त्रज्ज्ञ काय गवत उपटत होते का, असा खरमरीत सवाल त्यांनी केला.

दिग्गजांसह हजारो कार्यकर्त्यांची हजेरी
रायगड लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी अलिबागमधील समुद्रकिनाऱ्यावरील जेएसएम मैदानात जाहीर सभा रविवारी (दि.5) आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील, माजी मंत्री नसीम खान, काँग्रेस नेते हुसेन दलवाई, माजी आ. पंडित पाटील, आ. संजय पोतनीस, महाविकास आघाडीचे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, काँग्रेसचे प्रादेशिक सचिव ॲड. प्रविण ठाकूर, शेकाप जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, नृपाल पाटील, शिवसेनेचे नेते बबन पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, जिल्हा परिषद माजी अर्थ सभापती चित्रा पाटील, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, माजी उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, काँग्रेसचे जिल्हा महिला अध्यक्षा ॲड. श्रद्धा ठाकूर, काँग्रेसचे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर, शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, जिल्हा परिषद माजी सदस्य द्वारकानाथ नाईक, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप नाईक, शेकापचे युवा नेते सवाई पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, उल्का महाजन, मिलिंद नार्वेकर, सुभानअली खान, इम्तीयाज पालकर, रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य संजय पाटील, मुस्ताक घट्टे, प्रशांत मिसाळ, पिंट्या ठाकूर, काका ठाकूर, सुभाष महाडिक, सुनील थळे, शंकर गुरव आदी शेकापसह इंडिया आघाडीचे पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही जण हातात लाल झेंडा, काहीजण मशाल घेऊन ‘इंडिया आघाडीचा विजय असो’, ‘अबकी बार मोदी हद्दपार’, अशा घोषणा देत असल्याचे दिसून आले. एक वेगळा उत्साह यावेळी कार्यकर्त्यांमध्ये दिसून आला.
जनताच तटकरेंचा बदला घेईलः आ. जयंत पाटील
अनंत गीते यांना निवडून देण्यासाठी जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेण्यात आल्या. या सभांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. कार्यकर्ते व मतदार स्वयंस्फूर्तीने प्रचार रॅलीमध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे एक वेगळे वातावरण यानिमित्ताने पहावयास मिळत आहे. वेगवेगळ्या समाजातील मतदारांबरोबरच मुस्लीम समाजाचादेखील चांगला पाठिंबा मिळत आहे. ही निवडणूक ऐतिहासिक असणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाच्या संरक्षणासाठी ही लढाई आहे. मागच्या निवडणुकीत तटकरेंना निवडून दिले. मात्र, त्यांनी आपल्याशीच गद्दारी केली. त्याची चीड कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड आहे. सर्व कार्यकर्ते हा बदला घेण्यासाठी सज्ज आहेत.अनंत गीते यांना प्रत्येक तालुक्यात, केंद्रातून मताधिक्य मिळणार आहेत. त्या पद्धतीने कार्यकर्ते काम करीत आहेत. रायगडमधून तटकरेंना हद्दपार करण्याची प्रतिज्ञा केली आहे, ही प्रतिज्ञा प्रत्यक्षात उतरविण्यासाठी जनताच तटकरेंचा बदला घेणार आहे, असा विश्वास शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
तटकरेंना जनताच हद्दपार करणारः अनंत गीते
ही निवडणूक जनता विरूद्ध भाजप अशी असणार आहे. राज्यात 38हूून अधिक खासदार इंडिया आघाडीचे येणार आहेत. या निवडणुकीत तटकरेंना राजकारणातून जनताच हद्दपार करणार आहे, असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी केले. पुढे ते म्हणाले, या निवडणुकीत प्रचारासाठी शेकापचे जयंत पाटीलसह काँग्रेस, राष्ट्रवादी व इतर घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचंड मेहनत घेत आहे. गावागावात जाऊन प्रचार करीत आहेत. देश, संविधान वाचविण्यासाठी मतभेद विसरून इंडिया आघाडीच्या माध्यमातून सर्वजण एकत्र आले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत यश नक्कीच मिळणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सत्ता आल्यावर मोदी जेलमध्ये जातीलः हुसेन दलवाई
गेल्या काही वर्षांपासून राज्यात काळोख निर्माण करण्यात आला आहे. मनमानी कारभार करण्याबरोबरच सत्तेचा वापर करीत गुलाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशात पसरत आलेला अंधकार घालविण्यासाठी आणि प्रकाश आणण्यासाठी या निवडणुकीत अनंत गीतेंसह इंडिया आघाडीच्या उमेदवारांना बहुमांनी निवडून द्या. अनंत गीते निवडून आल्यावर ते मंत्री होणार आहेत. कोकणात रेल्वे सेवा सुरु राहिली पाहिजे. गरीबांच्या हाताला काम मिळाले पाहिजे. बेरोजगारांना रोजगार मिळेल या पद्धतीने काम केले जाणार आहे. हा क्रांतिकारक बदल घडवून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हा. इंडिया आघाडी सत्तेवर येणार आहे. इंडिया आघाडीची सत्ता आल्यावर मोदींना पळून देणार नाही, तर त्यांना जेलमध्ये पाठवू, असा इशारा काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी दिला.
हाती मशाल घेऊन गीतेंना विजयी कराः नसीम खान
ही निवडणूक देशाच्या स्वातंत्र्यासाठी, लोकशाही, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेले संविधान वाचविण्यासाठी असणार आहे. देशात सध्या राजकारण वेगळ्या पद्धतीने सुरु आहे. खोटे बोलून, वेगवेगळी आमिषे दाखवून गोरगरीबांसह जनतेला मूर्ख बनविण्याचे काम केले जात आहे. 2014मध्ये सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांच्या मालाचे भाव दुप्पट करणारे होते. नोकरी देणार होते; पण ही सर्व गॅरंटी खोटी ठरली आहे. शेतकऱ्यांसह तरुणांचे प्रश्न आजही प्रलंबित आहेत. मुंबईमध्ये कोकणासह वेगवेगळ्या जिल्ह्यातील नागरिक नोकरी, व्यवसायासाठी येतो. परंतु, त्यांच्या घशातील घास काढण्याचा डाव भाजपने सुरु केला आहे. मुंबईतील अनेक प्रकल्प गुजरातला पाठविण्यास सुरुवात झाली आहे. आर्थिक राजधानी लुटण्याचा घाट या मोदींनी घातला आहे. बॅ. अंतुलेनी रायगडचा विकास साधला. तटकरेंना राजकीय आश्रय दिला. मात्र, त्याच तटकरेंनी अंतुलेंसोबत गद्दारी केली. त्यांना धडा शिकविण्याची वेळ आली आहे. हातात मशाल घेऊन अनंत गीतेंना निवडून द्या, असे आवाहन माजी मंत्री नसीम खान यांनी केले.
कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष
महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ अलिबाग शहरामध्ये रविवारी प्रचार सभा आयोजित केली होती. या सभेला येण्यास कार्यकर्त्यांची दुपारी बारा वाजल्यापासून सुरुवात झाली. काहीजण हातात मशाल, काहीजण खांद्यावर शेकापचे, काँग्रेस, राष्ट्रवादीचे झेंडे घेऊन चालत येत होते. इंडिया आघाडीचा विजय असो, अनंत गीते यांनाच निवडून द्या अशा घोषणा देत होते. एक वेगळा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये दिसून आला. बोलता बोलता सभागृह पाच हजारांहून अधिक कार्यकर्त्यांनी भरून गेले. आघाडीतील प्रमुख नेत्यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केले. उद्धव ठाकरे यांच्यासह शेकापचे नेते आ. जयंत पाटील यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी घोषणांच्या जयघोषात त्यांचे स्वागत केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून उध्दव ठाकरे यांनी अभिवादन केले. शिवसेना नेते उद्धव ठाकरे भाषण करण्यासाठी उभे राहताच कार्यकर्त्यांनी जल्लोषात घोषणा दिल्या. त्यांनी भाषणाला सुरुवात केल्यावर संपूर्ण सभागृह शांत झाले. ठाकरे यांचे भाषण प्रत्येक कार्यकर्ता मन देऊन ऐकत होता. त्यांच्या भाषणांवर टाळ्यांचा व घोषणांचा पाऊस पडत असल्याचे दिसून आले. भाषण झाल्यावर राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.
Exit mobile version