सार्वजनिक शौचालय तोडल्याने आदिवासींची गैरसोय

। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायत मधील आदिवासी लोकांची वस्ती असलेल्या वाल्मिकीनगर भागातील सार्वजनिक शौचालय नेरळ ग्रामपंचायतने तोडले आहे.20 वर्षांपासून त्या ठिकाणी असलेले सार्वजनिक शौचालय तोडल्याने स्थानिक आदिवासी कातकरी समाजाच्या ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. दरम्यान, स्थानिक कातकरी समाजाने याबाबत आक्रमक भूमिका घेतल्याने आता नेरळ ग्रामपंचायत पुन्हा त्या ठिकाणी नव्याने सार्वजनिक शौचालय बांधणार आहे.

नेरळ ग्रामपंचायत मधील वाल्मिकीनगर भागात 20 वर्षांपूर्वी दोन सीट चे सार्वजनिक शौचालय नेरळ ग्रामपंचायतने बांधले होते. प्रामुख्याने कातकरी आदिवासी लोकांची वस्ती असलेल्या त्या भागात वस्ती वाढली आणि त्यामुळे दोन सीटचे सार्वजनिक शौचालय कमी पडू लागले. स्थानिक ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन नेरळ ग्रामपंचायतने 10 वर्षांपूर्वी त्या ठिकाणी असलेल्या सार्वजनिक शौचालयचा विस्तार करून दोन सीटचे शौचालय चार सीटचे तयार केले. स्थानिक कातकरी समाजाचे ग्रामस्थ यांच्याकडून कल्याण-कर्जत रस्त्याच्या कडेला असलेल्या त्या सार्वजनिक शौचालय चा वापर केला जात होता.मागील महिन्यात स्थानिक एका राहिवाशाने नेरळ ग्रामपंचायतकडे संबंधित सार्वजनिक शौचालयामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून ते तोडण्यात यावे अशी मागणी केली.त्यामुळे स्थानिकांचा ते सार्वजनिक शौचालय तोडण्यास हरकत असल्यास ग्रामपंचायत कार्यालयास कळवावे असा फलक नेरळ ग्रामपंचायतने त्या सार्वजनिक शौचालयावर लावून ठेवला.

आदिवासी कातकरी समाजाची वस्ती असलेल्या त्या आदिवासी लोकांनी नेरळ ग्रामपंचायतकडे हरकत घेतली नाही आणि 9 फेब्रुवारी रोजी नेरळ ग्रामपंचायतने ते सार्वजनिक शौचालय तोडून टाकले. मात्र त्यानंतर अडचणी निर्माण होऊ लागल्या आणि नेहमीचे सार्वजनिक शौचालय तोडून टाकण्यात आल्याने स्थानिक ग्रामस्थ यांची गैरसोय होऊ लागली.या भागातील अनेक ग्रामस्थांना थेट कोतवालवाडी भागातील मोकळ्या जागेत हातात डब्बा घेऊन जावे लागले होते.त्यामुळे त्या सर्व कातकरी समाजाच्या महिलांनी नेरळ ग्रामपंचायत कडे आपली तक्रार नोंदवली.स्थानिक कातकरी समाजाच्या लोकांच्या मूलभूत हक्कांवर आणि गरजांवर आघात करण्याचे काम करणार्‍या नेरळ ग्रामपंचायतचा जिल्हा परिषद चौकशी कारभार आहे काय? असा सवाल देखील उपस्थित होत आहे.

सार्वजनिक शौचालय तोडल्यानंतर वाल्मिकीनगर भागातील आदिवासी महिलांनी आमच्याकडे आपली होणारी गैरसोय कथन केली आहे. त्यानुसार त्याच जागेवर नवीन सार्वजनिक शौचालय बांधून देण्याची कार्यवाही नेरळ ग्रामपंचायत करणार असून स्थानिकांची गैरसोय करून कोणताही विकास साधला जाणार नाही. – उषा पारधी, सरपंच नेरळ



Exit mobile version