| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यामध्ये सध्या भात शेती करताना मजुरांची टंचाई भासत असल्यामुळे दिवसेंदिवस शेती करणे अधिक अवघड होत चालले आहे. या पार्श्वभूमीवर, भात लागवड अधिक सुलभ आणि खर्चिकदृष्ट्या किफायतशीर व्हावी यासाठी यांत्रिक पद्धतीने भात लागवड करण्याचे तंत्रज्ञान आजच्या काळाची गरज बनले आहे. त्यासाठी मुगपे येथील शेतकऱ्यांच्या बागेत यांत्रिक भात लागवडीसाठी ट्रेमध्ये रोपे तयार करण्याच्या प्रक्रियेचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. ही प्रात्यक्षिक कार्यशाळा तालुका कृषी अधिकारी शिंदे, प्रगत शेतकरी असीमकुमार सेन यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेत तालुक्यातील सुमारे 150 शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना ट्रेमधून भात रोपे तयार करण्याची प्रक्रिया, मशीनद्वारे रोपांची लावणी, तणनाशक फवारणीतील यांत्रिकी मदत, तसेच भात कापणीतील आधुनिक यंत्रसामग्रीचे फायदे यासंदर्भातील माहिती दिली गेली. यावेळी उपविभागीय खोपोली कृषी अधिकारी सुनील निंबाळकर, कर्जत तालुका कृषी अधिकारी हेमांगी सपकाळे, कर्जत मंडळ कृषी अधिकारी दिनेश कोळी, कर्जत उपकृषी अधिकारी शशिकांत गोसावी, लकळब सचिन केणे, नेरळ मंगेश गलांडे, कशेळे किरण गंगावणे आणि पळसदरी सहाय्यक कृषी अधिकारी श्रद्धा देवकर व इतर सर्व सहाय्यक कृषी अधिकारी उपस्थित होते.