| मुंबई | प्रतिनिधी |
भारतातील प्रमुख बंदरातील गोदी कामगारांसाठी वेतन करार व बोनस करार त्वरित करावा, मागील वेतन कराराची थकबाकी एक रकमी द्यावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी, रिकाम्या जागा त्वरित भराव्यात इत्यादी मागण्यासाठी मुंबई, कोलकत्ता, कांडला, गोवा, चेन्नई, विशाखापटनम, तुतिकोरीन, कोचीन, परादीप, न्यू मंगलोर व इतर प्रमुख बंदरातील बंदर व गोदी कामगारांनी जेवणाच्या सुट्टीत निदर्शने केली.
मुंबई बंदरात इंदिरा गोदीत आंबेडकर भवन समोर झालेल्या निदर्शनामध्ये ज्येष्ठ कामगार नेते अॅड. एस.के. शेट्ये, सुधाकर अपराज, विद्याधर राणे, केरशी पारेख, निवृत्ती धुमाळ, बबन मेटे, मिलिंद घनगुटकर यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. सभेचे सूत्रसंचालन मारुती विश्वासराव यांनी केले. याप्रसंगी द्विपक्षीय वेतन समितीची बोलणी करण्यासाठी अधिकारी व कामगार व अधिकारी यांच्या पगारातील विसंगतीबाबत बक्षी उपसमितीची नेमणूक केली होती. या समितीने दिलेला अहवाल कामगार विरोधी असल्यामुळे, या बक्षी अहवालाची गोदी कामगारांनी होळी करून जाहीर निषेध करण्यात आला. सदर कार्यक्रमास मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे उपाध्यक्ष निसार युनूस, शीला भगत, संघटक चिटणीस मनीष पाटील, विष्णू पोळ, प्रदीप नलावडे, मोरेश्वर कडू तसेच ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे पदाधिकारी विनोद पितळे, बापू घाडीगावकर, निवृत्ती भटकळ तसेच कामगार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.