| उरण | प्रतिनिधी |
ऊन-पावसाच्या बदलत्या वातावरणामुळे उरण तालुक्यात डेंग्यू, मलेरिया, ताप, सर्दी-खोकला, उलट्या-जुलाब यांसारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढत असल्याची माहिती समोर येत आहे. मागील महिनाभरात डेंग्यूचे अनेक रुग्ण आढळल्याचा दावा केला जात आहे.
आरोग्य विभागाकडून ग्रामपंचायतींना स्वच्छता व प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सूचना दिल्या जात असल्याचे सांगितले जाते. मात्र, सूचना देऊनही नियमित स्वच्छता, साचलेले पाणी हटविणे आणि डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करण्याची प्रभावी कार्यवाही होत नसल्याच्या तक्रारी गावागावातून पुढे येत आहेत. त्यामुळे रोगराई रोखण्याची जबाबदारी केवळ आरोग्य विभागावर टाकून चालणार नाही, तर ग्रामपंचायतींनीही जबाबदारीने काम करण्याची गरज आहे.
वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. उरणसारख्या मोठ्या तालुक्यात एकच ग्रामीण रुग्णालय आणि एकच प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने वाढत्या रुग्णांना पुरेशा आरोग्य सुविधा देताना अडचणी निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे शासनाने उरण तालुक्यात अतिरिक्त प्राथमिक आरोग्य केंद्रे, डॉक्टर, परिचारिका, आवश्यक कर्मचारी आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, उरणमधील काही खासगी दवाखाने रुग्णांनी फुल्ल झाल्याचे सांगितले जात असून, काही ठिकाणी जागेअभावी रुग्णांना जमिनीवर ठेवून सलाईन व उपचार केल्याच्या तक्रारीही पुढे आल्या आहेत. या तक्रारींची आरोग्य विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून सत्यता तपासावी. तसेच डॉक्टरांची वैद्यकीय पात्रता, नोंदणी आणि दवाखान्यांच्या सुविधांची तपासणी करून अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय आढळल्यास कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. उरण शहरासह चाणजे, जासई, कोप्रोली, चिरनेर, कळंबुसरे, विंधणे, करळ, सोनारी, चिर्ले, आवरे, वशेणी, बांधपाडा, पिरकोण, सारडे, नवघर, वेश्वी, बेलपाडा आदी परिसरात स्वच्छता आणि डास प्रतिबंधक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे.