डेंग्यूने राज्यात 22 जणांचा मृत्यू

। मुंबई । वृत्तसंस्था ।
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी राज्यात डेंग्यू आणि चिकुनगुनियाने डोके वर काढले आहे. डेंग्यूमुळे आत्तापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे, तर डेंग्यूचे सर्वाधिक 10 मृत्यू नागपूरमध्ये झाले असून त्यानंतर चंद्रपूर, वर्धा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.
राज्यात पावसाचे प्रमाण कमी होताच ऑगस्टपासून डेंग्यू आणि चिकुनगुनियाचा प्रादुर्भाव वाढला. गेल्या वर्षी करोनाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात असल्यामुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव तुलनेने कमी दिसत होता. परंतु या वर्षी करोनाची दुसरी लाट ओसरत असलेल्या काळात डेंग्यू आणि चिकुनगुनियाचा प्रसार पुन्हा वाढल्याचे आढळते.
ऑगस्टपर्यत डेंग्यूचे सुमारे तीन हजार रुग्ण आढळले होते आणि 11 जणांचा मृत्यू झाला होता. सप्टेंबरमध्ये मात्र डेंग्यूचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला असून 3401 रुग्ण नव्याने आढळले आहेत. ऑक्टोबरमध्ये तुलनेने रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी अजूनही आजाराचा प्रादुर्भाव फारसा कमी झालेला नाही. ऑक्टोबरच्या 20 दिवसांमध्ये डेंग्यूचे 1251 रुग्ण नव्याने आढळले आहेत.

Exit mobile version