। नेरळ । प्रतिनिधी ।
पुर्नचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना ‘अंबिया बहार 2024-26’ योजनेचा शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी विभागीय अधिकारी यांनी केले आहे. गेल्या तीन वर्षाच्या तुलनेत आंबा पिकाचा विमा हप्ता या वर्षी 50 टक्के कमी झाला असुन विमा संरक्षित 12 टक्के वाढ करण्यात आली आहे.
आंबा आणि काजू बागायतदार शेतकर्यांसाठी शासनाने आंबा आणि काजु पिकांसाठी पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपीक विमा योजना शासन निर्णयाने सुरू केला आहे. रायगड जिल्हयाकरीता यूनिव्हर्रसल सम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लि. अंधेरी-मुंबई ही कंपनी नेमलेली आहे. या अंतर्गत नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकर्यांना विमा संरक्षण मिळते. आंबा फळपिकाकरीता प्रति हेक्टर रक्कम रु. 14 हजार 450 व काजू फळपिकाकरीता प्रति हेक्टर रक्कम रु. 6 हजार इतका विमा हप्ता आहे. गारपीट या हवामान धोक्यापासून विमा संरक्षणासाठी अतिरिक्त विमा हप्ता आंबा फळपिका करीता रक्कम रु. 4 हजार 845 व काजू फळपिकाकरीता रक्कम रु. 2 हजार प्रति हेक्टर आहे.







