जिल्हा क्रिडा संकूलाच्या देखभाल दुरुस्तीसाठी निधीची प्रतिक्षा कायमच
| अलिबाग | प्रमोद जाधव |
कोविड काळात कोव्हिड केंद्रासाठी आरोग्य विभागाने जिल्हा क्रीडा संकुलाचा फुकटात वापर करून घेत वेळ मारुन नेली. या कालावधीत खेळ बंद असल्याकारणाने जिल्हा क्रिडा विभागानेही रुग्णांची हेळसांड होऊ नये, याकरीता भाडेतत्वावर जागा वापरासाठी दिली. मात्र आज दोन वर्षे उलटून गेली तरीही आरोग्य विभाग तसेच जिल्हा रुग्णालय प्रशासन क्रिडा संकुलाचे 33 लाख रुपये भाडे देण्यास असमर्थ ठरले आहे. त्यामुळे क्रिडा संकुलात आरोग्य विभागाने फुकटचा खेळ केल्याची चर्चा जोर धरु लागली आहे.
अलिबाग तालुक्यातील जिल्हा क्रिडा संकुल हे अनेक समस्यांच्या गर्तेत अडकले आहे. अपुऱ्या निधीमुळे अनेक कामे प्रलंबित आहेत. त्यामुळे तालुक्यातील खेळाडूंना त्याचा फारसा वापर करता येत नाही. अशातच जिल्हा प्रशासनाने 33 लाख रुपयांचे भाडे थकविल्यामुळे संकुलाची दुरुस्ती व देखभाल करणे कठिण झाले आहे. परिणामी, खेळाडूंना याचा फटका बसत आहे.
अलिबाग तालुक्यातील नेहुली येथे करोडो रुपये खर्च करून जिल्हा क्रीडा संकुल बांधण्यात आले. या संकुलाचा लोकार्पण सोहळा 2015 मध्ये मोठा गाजावाजा करीत संपन्न झाला. भव्यदिव्य असे मैदान, प्रेक्षक गॅलरी, धावपट्टी, अंतर्गत खेळ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या खेळासाठी मैदान उभारण्यात आले होते. तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कार्यालयासाठी प्रशासकीय इमारतही या परिसरात बांधण्यात आली. जिल्हा क्रीडा संकुलाच्या देखभाल दुरुस्तीसाठी तीन वर्षे निधी शासनाकडून देण्यात आला. त्यानंतर संकुलाच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी व लागणारा निधी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने वेगवेगळ्या उपक्रमातून करण्याचे आदेश शासनाने दिले.
2019 ते 2020 या दोन वर्षाच्या कालावधीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा क्रीडा संकुलाचा वापर भाडेतत्वावर जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा रुग्णालय प्रशासनाने केला. जिल्हा क्रीडा संकुलाला आरोग्य विभागाकडून 33 लाख रुपयांचे भाडे येणे शिल्लक आहे. गेल्या दोन वर्षापासून ही यंत्रणा थकीत भाड्याची मागणी करीत आहे. परंतु आरोग्य विभागाकडून अद्यापर्यंत भाडे देण्यात आले नाही.
जिल्हा क्रीडा संकुलाची प्रशासकीय इमारत, सभागृहाला गळती लागली असून स्विमींग पूल खराब झाले आहे. या इमारतीमध्ये कबूतरांनी अस्वच्छता केली आहे. परिसरात वाढलेले गवत अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्यांचे निराकरण करण्याबरोरच देखभाल दुरुस्तीसाठी करोडो रुपयांची गरज आहे. मात्र निधी अभावी देखभाल दुरुस्तीचे काम रखडले असल्याची माहिती कार्यालयाकडून मिळाली आहे.
तीन तालुक्यांना क्रिडा संकुलाची प्रतीक्षा
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड आणि पोलादपूर तालुक्यांमध्ये तालुका क्रीडा संकुलाचा अभाव आहे. या संकुलांसाठी जागा उपलब्ध नसल्याने आजही या तालुक्यांना क्रीडा संकुलाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. शासनाकडून क्रीडा संकुलासाठी प्रत्येकी एक कोटी रुपये मंजूर आहेत. मात्र जागेअभावी हा निधी पडून असल्याची माहिती समोर येत आहे.
दुरुस्तीसाठी अडीच कोटींची गरज
जिल्ह्यातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी जिल्हा क्रीडा संकूल नऊ वर्षापूर्वी बांधले. मात्र या संकुलाचा वापर जास्तीत जास्त निवडणूकीसह कोव्हिड सेंटरसाठी करण्यात आला आहे. त्यामुळ खेळाडूंना खेळण्याची संधीच मिळाली नाही. या संकुलाची अवस्था बिकट झाली आहे. दुरुस्तीसाठी अडीच कोटींची गरज आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अंदाजपत्रक मंजूर करण्यासाठी मागणी केली असल्याची माहिती क्रिडा विभागाकडून देण्यात आली.
जिल्हा क्रिडा संकुलामध्ये वेगवेगळ्या क्लबमार्फत स्पर्धा होतात. त्यातून भाडे मिळते. परंतु तो निधी अपूरा पडत असल्याने विद्यूत बील, आणि कर्मचाऱ्यांचे वेतनही निघत नाही. संकुलाच्या देखभाल दुरुस्तीसाठी लागणाऱ्या निधीची मागणी शासनाकडे करण्यात येणार आहे.
राजेंद्र अतनुर, जिल्हा क्रीडा अधिकारी





