खारघरमधील उद्यानांची पुरती दैना; खेळण्यांची झाली दुरवस्था

| पनवेल | वार्ताहर |

खारघर शहरातील मैदाने, उद्यानांची तसेच उद्यानातील खेळण्यांची दुरवस्था झाली असून, उद्यानातील तुटलेल्या खेळण्यांवर खेळून इजा करुन घेणार का? असा प्रश्‍न बच्चेकंपनीकडून उपस्थित केला जात आहे.

एकविसाव्या शतकातील आधुनिक आणि शैक्षणिक शहर म्हणून खारघर शहराची ओळख आहे. खारघर शहरात ‘सिडको’ने सेक्टरनिहाय उद्यान आणि मैदान उपलब्ध करुन दिले आहे. सदर उद्यान सिडकोकडे असताना उद्यान आणि मैदानाची देखभाल केली जात होती. मात्र, पनवेल महापालिका अस्तित्वात आल्यानंतर ‘सिडको’ने खारघर शहरातील मैदाने आणि उद्याने महापालिकेकडे हस्तांतरीत केली आहेत.

खारघर सेक्टर-20 शिल्प चौक, सेक्टर-21 मधील उद्यान तसेच इतरही सेक्टरमधील उद्यानात घसरगुंडी, झोपाळा यांसह इतर खेळणी सिडकोकडून उपलब्ध करुन देण्यात आली होती. स्थानिक रहिवाशांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या सात-आठ महिन्यांपासून उद्यानातील खेळणी तुटली आहेत. बच्चेकंपनी उद्यानांमध्ये खेळायला जाण्यासाठी एका पायावर तयार असतात. मनसोक्त हुंदडायचे असाच त्यांचा प्लॅन असतो. पण, शहरातील उद्याने खरोखरीच मुलांना खेळण्यायोग्य आहे का, याच्याकडे कुणाचेच लक्ष नाही. आज मुलांना खेळण्यासाठी जागा शिल्लक राहिलेली नाही. उद्यानांच्या दुरवस्थेमुळे तेथे मुलांना घेऊन जाणेही पालकांना नको वाटते. प्रत्येक सोसायटीत मुलांना खेळायला जागा असेलच असे नाही. खेळण्यासाठी जागा नसलेल्या सोसायटीतील मुले रस्त्यावरच खेळत असतात. खारघर शहरातील उद्यानामधील खेळणी तुटलेली असल्याने ‘आम्ही खेळायचे कसे’, असा सवाल बच्चे कंपनी उपस्थित करीत आहे.

खारघर शिल्प चौक आणि इतर उद्यानातील तुटलेली खेळणी तातडीने दुरुस्ती केली जातील.

राजेश-कर्डीले, उद्यान अधिकारी, पनवेल महापालिका
Exit mobile version