| पनवेल | ग्रामीण प्रतिनिधी |
कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील 5 लाख रुपयांवरील ठेवी अद्याप परत न मिळाल्याने ठेवीदारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. त्यामुळे जून महिन्याच्या अखेरीस कळंबोली सर्कल परिसरात मोठे रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्धार ठेवीदारांनी व्यक्त केला आहे. हे आंदोलन सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
पनवेल संघर्ष समितीच्या पाठपुराव्यामुळे आणि भारतीय रिझर्व्ह बँकेकडे सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवीदारांना विमा योजनेतून रक्कम मिळाली. मात्र, अजूनही सुमारे अडीच हजार ठेवीदारांचे तब्बल 167 कोटी रुपये अडकून पडले असून, राज्य व केंद्र सरकार या प्रश्नावर प्रभावी तोडगा काढण्यात अपयशी ठरल्याचा आरोप ठेवीदारांनी केला. दरम्यान, पुढील 15 दिवसांत आणखी एक बैठक घेऊन आंदोलनाची अंतिम दिशा ठरवण्यात येणार आहे. यावेळी गणेश बडगुजर, मनोहर उरणकर, अमित ठाकूर, प्रदीप मोकळ, हेमंत घाडी, राजेश कोळी, अरविंद फडणवीस, के. पी. चटर्जी आणि नारायण राऊत आदी उपस्थित होते.
ठेवीदारांचा संघर्ष पुन्हा तीव्र
