नाचणी लागवडीत उदासीनता

मेहनत, खर्चाच्या तुलनेत अल्प मोबदला; कृषी विभाग ठरतोय अपयशी

। अलिबाग । प्रतिनिधी ।

कोकणातील जमिनीत नाचणीचे पीक चांगले येते. नाचणीचे पीक मानवी शरीरासाठी अत्यंत पौष्टिक असल्याने दैनंदिन जेवणात त्याचा समावेश करण्यासाठी कृषी विभागाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. मात्र, नाचणी पिकासाठी करावी लागणारी मेहनत, जंगली प्राण्यांचा उपद्रव आणि मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे रायगड जिल्ह्यात नाचणीच्या लागवडील क्षेत्रात फारशी वाढ झाल्याचे दिसत नाही.

यंदाच्या खरीप हंगामासाठी 2, 876 हेक्टर क्षेत्रावर कृषी विभागाने नाचणी पिकाच्या लागवडीचे नियोजन केले आहे; मात्र, प्रत्यक्षात इतक्या क्षेत्रावर नाचणी पिकाची पेरणी करण्याची शेतकर्‍यांनी तयारीच दर्शवली नाही. नाचणीला प्रोत्साहन मिळावे, म्हणून कृषी विभागाने फार्महाऊस मालकांना नाचणीची पेरणी करावी, असे आवाहन केले होते. कोकणातील दर्‍या-खोर्‍यात नाचणी, वरी या तृणधान्याचे पीक पूर्वी मुबलक प्रमाणात घेतले जायचे. कालांतराने शेतकर्‍यांनी विकलेल्या जमिनीवर फार्महाऊस बांधण्यात आले. फार्महाऊसमध्ये असलेल्या मोकळ्या जागेत नाचणीची लागवड करण्यासाठी कृषी विभागाकडून मार्गदर्शनही करण्यात आले होते. यासाठी दोन हजार किलो नाचणीचे बियाणे मोफत वाटण्यात आले. इतके प्रयत्न करूनही रायगडमधील शेतकर्‍यांनी नाचणीचे पीक घेण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

संयुक्त राष्ट्राने 2023 वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष घोषित केले होते. त्यानुसार यंदाही जिल्ह्यातील अतिदुर्गम गावापर्यंत पौष्टिक तृणधान्याची लागवड ते प्रक्रियेपर्यंत मार्गदर्शन केले जात आहे. रायगड जिल्ह्यात आंबा आणि काजू लागवडीला प्रोत्साहन मिळण्यापूर्वी नाचणी, वरी या तृणधान्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जायची. अपार मेहनत आणि अल्प मोबदला यामुळे हे क्षेत्र घटले असून जेमतेम दोन हजार हेक्टरपर्यंत आले आहे.

जिल्हा व तालुकास्तरिय कार्यशाळा, पीक प्रात्यक्षिके, पीक संग्रहालय, लागवड पद्धती, ग्राम कृषी सभेमध्ये पौष्टिक तृणधान्याबाबत चर्चा व मार्गदर्शन, पौष्टिक तृणधान्य प्रक्रियाबाबत प्रशिक्षण, आहार तज्ज्ञांशी संवाद, विविध शाळांमध्ये निबंध व चित्रकला स्पर्धांचे आयोजन, महिला बचतगटांसाठी पाककला स्पर्धा व प्रशिक्षण कार्यक्रम, पथनाट्य इत्यादी उपक्रम राबवण्यात आले होते. नाचणी, वरीचे पीक मुख्यतः आदिवासी कुटंब घेतात. या धान्याला चांगली किंमत मिळवून देण्याचा प्रयत्न कृषी विभागाचा आहे. कुपोषण समस्या व पोषणमूल्य सुधारण्यासाठी मिलेटचा आहारात वापर वाढवणे, त्यांचे लागवडक्षेत्र वाढवणे, त्यांच्या उपयुक्ततेबाबत समाजात जनजागृती केली जात आहे. नवीन पिढीच्या व लहान मुलांच्या आवडीचे पदार्थ जसे की, ब्रेड, बिस्किट, केक, इडली, डोसा, चकली इत्यादी पदार्थ पौष्टिक तृणधान्यावर प्रक्रिया करून बनवता येतात. असे पदार्थ बनवून त्यांचा आहारात समावेश वाढविणे आवश्यक आहे. तृणधान्य वर्षाच्या निमित्ताने शाळांमध्ये पालकांना माहिती देण्यात आली.

साधारण 30 वर्षांपूर्वी रायगड जिल्ह्यात नाचणी हे पीक भात पिकानंतर दुसर्‍या क्रमांकाने घेतले जायचे. हे पीक घेण्यासाठी येथील जमीन, वातावरण अनुकूल आहे. मात्र कराव्या लागणार्‍या कष्टामुळे शेतकरी पुन्हा नाचणी पिकाकडे येऊ शकलेले नाहीत. ज्या ठिकाणी पूर्वी हे पीक घेतले जात असे, तेथे तयार झालेल्या फार्महाऊसमध्ये नाचणीचे पीक घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे.

सतीष बोराडे,
प्रकल्प संचालक,
आत्मा.
Exit mobile version