खंडित वीज पुरवठ्यामुळे वंचित बहुजन आघाडी आक्रमक

। पाली /बेणसे । वार्ताहर ।

सुधागड तालुक्यात विजेचा लपंडाव सुरु आहे. या खंडित होणार्‍या वीज पुरवठ्यामुळे सर्वसामान्य जनता व व्यावसायिक हैराण झाले आहेत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आक्रमक होऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाली वीज वितरण उपअभियंत्यांना निवेदन देऊन जाब विचारला. तसेच मेणबत्ती व दिवा भेट देऊन अनोखे आंदोलन केले. काही काळात वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देखील दिला.

सुधागड तालुका हा मागास व ग्रामीण तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील सामान्य जनता, विद्यार्थी, कामगार लघुउद्योग, शाळा आदी आस्थापने या विजेवर चालणार्‍या उपक्रमांवर अवलंबून आहेत. तालुक्यातील ग्राहक नियमितपणे वीज बिल भरत असतात, आणि ते न भरल्यास तातडीने ते आपल्याकडून खंडित केले जाते. वारंवार वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याने येथील जनता त्रस्त आहे. असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतेवेळी वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हाध्यक्ष अमित गायकवाड, तालुका अध्यक्ष राहुल गायकवाड, तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत जगताप, नारायण जाधव, भागवत गायकवाड, प्रशांत गायकवाड, नितेश पवार, बाळाराम गायकवाड व आनंद जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version