जि.प.च्या प्रलंबित निवडणूकांचा फटका; गेल्या तीन वर्षांपासून वितरण नाही
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
उत्कृष्ट कामगिरी करणार्या प्राथमिक शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार दरवर्षी वितरीत केला जातो. मात्र, गेल्या तीन वर्षात जिल्हा परिषदेची निवडणूक झाली नसल्याने पुरस्कार वितरण सोहळा लांबणीवर गेला आहे. आतापर्यंत शंभरहून अधिक शिक्षकांना प्रत्यक्ष पुरस्कार देणे प्रलंबित आहे.
रायगड जिल्हा परिषद शाळेसह माध्यमिक शाळेतील शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम केले जाते. काही शिक्षक शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा बौद्धीक विकास वाढविण्याबरोबरच शारिरीक विकास वाढविण्याचा प्रयत्न करतात. विद्यार्थी शाळेत टिकविण्यासाठी शिक्षक वेगवेगळे उपक्रम राबवितात. तसेच, शाळा व्यवस्थापन समितीसह माजी विद्यार्थी संघटनेच्या मदतीने तसेच रॅली, सभांच्या माध्यमातून जनजागृती करून मुलांना जिल्हा परिषद शाळेत पाठिवण्याचे आवाहन शिक्षक करतात. गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कर्तृत्वान शिक्षकांना 5 सप्टेंबर रोजी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.
जिल्हा परिषद शाळेसह माध्यमिक शिक्षकांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या अनेक वर्षापासूनची ही परंपरा जपली जात आहे. मात्र, गेल्या तीन वर्षापासून जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळाच झाला नसल्याची माहिती समोर आली आहे. सध्या जिल्हा परिषदेवर प्रशासकिय कामकाज सुरु आहे. जिल्हा परिषदेची निवडणूक न झाल्याने हा वितरण सोहळा झाला नसल्याची माहिती जिल्हा परिषदेकडून उपलब्ध झाली आहे. गेल्या तीन वर्षापासून 100 पेक्षा जास्त आदर्श शिक्षकांचे पुरस्कार देणे प्रलंबित आहे. जो पर्यंत जिल्हा परिषदेची निवडणूक होत नाही, जिल्हा परिषद अध्यक्षांपासून सदस्य बसत नाही, तो पर्यंत पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम थांबविण्यात आला आहे. पुरस्कार जाहीर होऊन अनेक महिने उलटून गेले आहेत. मात्र, प्रत्यक्षात शिक्षकांना आदर्श पुरस्कार अजूनपर्यंत मिळाले नाही.
जिल्हा परिषद अध्यक्षांसह सभापती, सदस्य आदी कार्यकारणीच्या उपस्थित हा सोहळा साजरा केला जातो. मात्र, उद्याप निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे पुरस्कार वितरणाचा सोहळा घेतला नाही.
भोपाळे,
उपशिक्षणाधिकारी