। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने थैमान घातला आहे. हजारो नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. सरकारनेही कोरोनाची नियमावली जाहीर करीत वेळावेळी मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर, गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. सध्या अनलॉक असले तरीही कोरोनाचे संकट टळलेले नाही. सरकारच्या नियमाप्रमाणे मास्क घालणे बंधनकारक असताना महाविकास आघाडीतील पालकमंत्री अदिती तटकरे व आ. अनिकेत तटकरे यांनीच सरकारच्या नियमांना केराची टोपली दाखविल्याचे दिसून आले. दिवेआगर येथील कार्यक्रमात अदिती तटकरे व आ. अनिकेत तटकरे यांनी मास्क न घालताच कार्यक्रमात हजेरी लावल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची चांगलीच कानउघडणी केली.
यावेळी पवार यांनी सांगितले कि, अजूनही आपल्यावरील कोरोनाचे संकट गेलेले नाही. बरेच लोकं मास्क न लावताच फिरत आहेत. मला सकाळी घ्यायला आलेले सुनील तटकरे यांनी मास्क घातला; परंतु अदिती तटकरे व अनिकेत तटकरे यांनी मास्क घातला नव्हता. त्यावेळी मी त्यांना सांगितले कि आपल्या वडिलांकडून चांगले शिका. मास्क घाला.आज रशिया, युरोपमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रात वाढू नये, यासाठी सर्वांनी कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
मास्क वापरणे सक्तीचे केले आहे; तरी नागरिक काळजी घेत नाहीत. जिल्हाधिकारी यांनी दोन डोस घेतलेल्यांना आपल्या कार्यालयात परवानगी द्यावी. लवकरात लवकर शाळा लवकरच सुरू करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.