कार्तिकी यात्रेसाठी उपमुख्यमंत्र्यांना बंदी

| पंढरपूर | वृत्तसंस्था |

पंढरपूरमध्ये होणाऱ्या विठ्ठलाच्या कार्तिकी एकादशीची शासकीय महापुजा करण्यासाठी येणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांना पंढरपुरात येण्यास मराठा आंदोलकांनी मज्जाव केला आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही उपमुख्यमंत्र्याला इथं येऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा मराठा आंदोलकांनी घेतला आहे.

या यात्रेच्या नियोजनासाठी बोलावण्यात आलेली बैठकही या आंदोलकांनी उधळून लावण्याचा प्रयत्न केला. तसेच, मंदिर समितीनं देखील याबाबत सरकारपर्यंत मराठा समाजाची मागणी कळवू, असं सांगत सावध पवित्रा घेतला आहे. मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांचा इशारा डावलून उपमुख्यमंत्र्यांना बोलावण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांच्या आणि मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळं फासू , यासाठी पोलीस बळाचा वापर केलातर पंढरपुरात मोठं आंदोलन होईल, त्याला प्रशासन जबाबदार असेल, असा इशारही मराठा आंदोलकांनी दिला. परंपरेप्रमाणं पंढरपुरातील आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापुजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडते. तर कार्तिकी एकादशीची महापुजा उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते पार पडते. पण यंदा राज्यात दोन उपमुख्यमंत्री असल्यानं याबाबत पेच निर्माण झाला आहे. तसेच, मराठा समाजानं आरक्षणावरुन आक्रमक पवित्रा घेतल्यानं कुठलीही थेट भूमिका न घेता मराठा समाजाने मंदिर समितीला दिलेले निवेदन सरकारपर्यंत पोहोचवू, असा सावध पवित्रा मंदिर प्रशासनानं घेतला आहे.

Exit mobile version