। पुणे । वृत्तसंस्था ।
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पहायला मिळाले. या निवडणुकीपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंधुदुर्गाचा दौरा केला होता. या दौर्यावरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता.
नारायण राणे यांनी केलेल्या या टीकेनंतर आज अजित पवारांनी नारायण राणेंना प्रत्युत्तर देत, एकमेकांची उणी-दुणी काढण्यापेक्षा त्यांनी केंद्रातून निधी आणण्याचा सल्ला दिला आहे.
याशिवाय, सिंधुदुर्ग बँकेच्या निवडणुकीत दुर्दैवाने महाविकास आघाडीला यश मिळाले नाही, ज्यांना यश मिळाले त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांनी ही बँक चांगली चालवावी अशा शुभेच्छा देतो, अशा शब्दात अजित पवार यांनी पराभव स्वीकारत विजयाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
तर अर्थमंत्री येऊनही बँकेच्या निवडणुकीत फरक पडला नाही. या नारायण राणे यांच्या वक्तव्याबाबत बोलताना अजित पवार यांनी नारायण राणे हे केंद्रात मंत्री आहेत. कोकणात तौक्ते चक्रीवादळ आलं तेव्हा मदत केली. निसर्ग चक्रीवादळाच्या घटनेनंतर मदत केली. ज्या ज्या गोष्टी कोकणात करायला हव्यात त्या करम्याचा आमचा प्रयत्न आहे. एकमेकांच्या उणी दुणी काढण्यापेक्षा केंद्रात तुम्ही मंत्री आहेत तुमच्या परीने केंद्रातून निधी आणावा. आम्ही आमच्या परीने राज्यातून निधी देऊ. अशाप्रकारे सर्व मिळून कोकणाचा विकास करू असेही अजित पवार म्हणाले.
जिल्हा बँक निवडणुकीपूर्वी नारायण राणे यांनी अजित पवारांवर टीका केली होती. कोण अजित पवार मी ओळखत नाही अजित पवारला. या राज्यातील लोकांच्या कोट्यवधी रुपयांचा आरोप आहे त्यांचा रेफरन्स काय देता तुम्ही? तसेच निवडणूक निकालानंतर नारायण राणे यांनी निकालानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली. ज्यांना अक्कल आहे त्यांच्या हातात जिल्हा बँक आलेली आहे, असा टोलाही नारायण राणे यांनी लगावला होता.
दरम्यान, पुणे जिल्हा बँकेसाठी निवडणूक प्रक्रिया संपन्न होत आहे. या निवडणूकीत राज्यातील महाविकास आघाडीचा फॉम्यूला लागू करण्यात आला आहे. एकेकाळी राष्ट्रवादीचा गड असलेल्या पुण्यात भाजपने स्थानिक स्वराज्य संस्था तथा सहकारी संस्था काबीज केल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची विशेषतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली ऊसन, आता विजयाचा गुलाल कोण उधळणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.