उपअभियंता श्रुती गायकवाडचे निधन

| महाड | प्रतिनिधी |

किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या ऐतिहासिक पाचाड गावातील सिद्धार्थ भागुराम गायकवाड यांची कन्या श्रुती हिने जिद्दीच्या जोरावर प्रशासकीय परीक्षा दिली आणि श्रुती हिला महाट्रान्सकोमध्ये उपअभियंतापदावर नेमणूकदेखील झाली. मात्र, नियतीला हे भावले नाही आणि अल्पशा आजारामध्ये तिचे निधन झाले.

बौद्धजन उत्कर्ष मंडळ मुंबई पाचाड या मंडळाचे कार्याअध्यक्ष सिद्धार्थ भागुराम गायकवाड नोकरी व्यवसायनिमित्त मुंबई येथे आहेत. त्यांची द्वितीय कन्या श्रुती जिने जीवाची बाजी लावून अथक परिश्रम घेऊन प्रशासकीय परीक्षा दिली होती. उत्तम यश संपादन करत महाराष्ट्र शासनाच्या महाट्रान्सको या कंपनीमध्ये उपअभियंता या पदावर नुकतीच रुजू झाली होती. एकीकडे तिच्या यशाचे गोड कौतुक सर्वत्र सुरू होते. जन्मगाव असलेल्या पाचाडमध्येदेखील तिचा नुकताच सत्कार झाला होता. तर, महाडमध्येदेखील समाजाच्या वतीने सत्कार केला जाणार होता. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेचे होते. श्रुतीला अचानक ताप आल्याने अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या अल्पशा आजारातच मृत्यूशी झुंज देत असताना वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी दिनांक 12 सप्टेंबर रोजी दुपारी 1.30 वाजता तिचे आकस्मिक निधन झाले.

श्रुती गायकवाड या तरुणीचे यश आणि त्यातून सुरू झालेले भावी आयुष्य याला नियतीने मात्र साथ दिली नाही. यामुळे अल्पशा आजारात निधन झाल्याने संपूर्ण परिसरामध्ये आणि समाजामध्ये शोक व्यक्त केला जात आहे.

Exit mobile version