शिर्डीचा उमेदवार सूर्याजी पिसाळाची अवलाद

अंबादास दानवेंची लोखंडेंवर जहरी टीका

। नेवासा। प्रतिनिधी ।

महाराष्ट्र हा निष्ठावंतांचा आहे. महाराष्ट्र खंडोबा खोपडे आणि सूर्याजी पिसाळासारख्या गद्दारांचा नाही. शिंदे गटाचा शिर्डीचा उमेदवार सूर्याजी पिसाळाची अवलाद आहे, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी केली. शिर्डी लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ अंबादास दानवे यांनी प्रचारसभा घेतली. नेवासा तालुक्यातील सोनई येथे मविआची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख, आमदार सुनील शिंदे, आमदार नितीन देशमुख यांची उपस्थित होते. अंबादास दानवेंनी यावेळी बोलताना भाजपवर चौफेर टीका केली. अंबादास दानवे म्हणाले, मशाल विशाल विजय घेऊनच पुढे जाणार आहे. उध्दव ठाकरेंवर टीका करण्यासाठी प्रधानमंत्र्यांना एव्हढ्या सभा घ्याव्या लागतात. हेच आपले यश आहे. देशभरात भाजपच्या जागा कमी होणार आहेत. मात्र, 400 पार हा माईंड गेम आहे. देशात इंडिया आघाडीचे सरकार येणार आहे.

पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले, कांदा निर्यातीला परवानगी दिली. मात्र, त्यावर अबकारी कर लावला. पळ म्हणायचे आणि पाय बांधून ठेवायचे, अशी सरकारची कामगिरी आहे. अभिजित पाटील मविआच्या सभेत असताना त्याच्या कारखान्यावर कारवाई करण्यात आली. दुसर्‍या दिवशी त्याने फडणवीसांची भेट घेतली. तिसर्‍या दिवशी भाजपात प्रवेश केला आणि त्याच कारखान्यावर सभा झाली. हे भाजपच्या बापाचे राज्य आहे का? असा सवालही दानवे यांनी केला.

Exit mobile version