वनविभागाची परवानगी मिळूनही मोबदल्याअभावी महामार्ग रखडणार

| महाड | प्रतिनिधी |
मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाचे दुसर्‍या टप्प्याचे काम 70 टक्के पूर्ण झाले आहे. जे उर्वरीत काम आहे ते ही संबंधित ठेकेदार कंपनी लवकर पूर्ण करण्याच्या प्रयत्न करीत आहे. अनेक ठिकाणी जमीनमालक आणि खात्याच्या अडचणी मुळे महामार्गाचे काम थांबले होते. तालुक्यात जे 3 किमीचे काम वन खात्याच्या परवानगीमुळे थांबले होते.त्याला परवानगी मिळाली असली तरी अध्याप या टप्प्यात मालकी जमिनीच्या मोबदल्याचा प्रश्‍न आजही कायम असल्याने काम सुरू होण्यास अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


महाड आणि पोलादपूर या दोन तालुक्यात 38:76 किलोमीटर चे आहे. या टप्प्यात 35किमी काम ठेकेदार कंपनी एल.एन्ड.टी. यांच्या कडून पूर्ण झाले आहे .मात्र दासगाव ते वीर या टप्प्यात वनखात्याची परवानगी नसल्याने काम बंद होते. नुकतीच वन खात्याने कामास परवानगी दिल्याने सध्या या टप्प्याचे काम सुरू झाले आहे. वनखात्याने शासकीय जमिनीला ज्या प्रमाणे परवानगी दिली त्या प्रमाणे खाजगी जमीन अध्याप मोबदला दिला नसल्याने जमीन मालक अध्याप आपल्या जमिनीमध्ये काम करून देण्यास तयार नाही, त्यामुळे मालकी जमिनीत काम करण्यास अडथळे कायमच राहिले आहेत.

ही हद्द महाड तालुक्यातून वीर गावा पासून सुरु होते तर पोलादपूर तालुक्यातील भोगाव गाव हद्दीत समाप्त होते. ज्या मालकीच्या जमिनींवर वने लावण्यात आलेली आहेत अशा जमिनींना वन खात्या कडून अध्याप परवानगी मिळाली नसल्याने ते जमीन मालक आजही महामार्गाच्या मिळणार्‍या मोबदल्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे जमीन मालक महामार्गाचे काम करून देण्यास तयार नाहीत. सध्या महाड आणि पोलादपूर तालुक्यातील 38.76 किलोमीटर च्या अंतरात महाड तालुक्यातील वीर या गावहद्दीतील 7 जमीन धारकांचा मोबदला मिळालेला नाही, दासगाव मध्ये 3,साहिल नगर आय डी सी 2 आणि पोलादपूर तालुक्यातील चोळई या ठिकाणच्या 4 शेतकर्‍यांचा जमीन मोबदला शिल्लक आहे. तर राजेवाडी गावाच्या हद्दीत हाय पॉवर वीज टॉवर शिफ्टिंग आहे.

सुमारे 2 किमी जमीन संपादित करण्याचा प्रश्‍न अद्यापही सुटलेला नाही.संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला तातडीने दिल्यास काम त्वरित सुरू होईल व महामार्गाच्या कामातील दूर होतील. शिल्लक राहिले काम ठेकेदार कंपनी पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहे. राज्य शासनाकडून वरील अडचणी त्वरित दूर न केल्यास ठेकेदार कंपनी काम सोडून जाण्याच्या तयारीत असल्याचे कंपनीच्या अधिकार्‍यांकडून बोलले जात आहे.

Exit mobile version