। मुरुड जंजिरा । वार्ताहर ।
मुरुड तालुक्यातील भोईघर गावा नजीक एका इलेक्ट्रिक पोलच्या जवळ शेतामध्ये गुरे चरत असताना अचानक पोल वरील विद्युत वाहिनी पाळीव जनावरांच्या अंगावर पडल्याने आठ पाळीव जनावरांचा जागीच मुत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
वीज महावितरण कंपनीच्या ढिसाळ कारभाराबाबत मात्र स्थानीक शेतकर्यांनी संताप व्यक्त केला आहे. मागील काही महिन्यापूर्वी सुद्धा अशीच घटना बोर्ली भागात घडली असताना तिथे सुद्धा जनावरांचा मुत्यू झाल्या नंतर अवघ्या काही महिन्यातच पुन्हा अशीच घटना घडल्याने वीज महावितरणचा गलथान कारभार समोर आला आहे. या भागातील स्थानीक शेतकर्यांनी मोठा संताप व्यक्त केला असून सदरची घटना वीज महावितरण कंपनीच्या वीज कर्मचार्यांच्या निष्काळजीपणामुळे घडला असून दुभती जनावरे मुत्यूमुखी पडली आहेत .तातडीने येथील शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
विद्युत वाहिनी पाळीव प्राण्यांच्या अंगावर पडल्यामुळे तीन गाई,चार बैले,व एक वासरू यांचा मुत्यू झाला आहे. सदरील घटनेची रेवदंडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पाळीव जनावरांचा मुत्यू होताच पशु वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुदर्शन पाडावे यांनी या पाळीव प्राण्यांचे शव विच्छेदन करून सदरील प्राण्यांना विजेचा मोठा शॉक लागल्याने सदरील प्राण्यांचा मुर्त्यू झाल्याचे स्पष्ट केले आहे. केशव कासार यांची तीन जनावरे, सचिन महागावकर यांची दोन जनावरे, तर महेंद्र कदम, प्रफुल्ल वाघे, व पीटर पेय यांची प्रत्येकी एक एक जनावरांचा मुत्यू झाला आहे.