रानडुकरांकडून भातपिकाची नासधूस

शेतकरी घेणार वनमंत्र्यांची भेट
| पोलादपूर | प्रतिनिधी |

तालुक्यात रानडुकरांनी उच्छाद मांडला असून, शेतीची नासधूस करीत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वनविभागामार्फत शेतकर्‍यांच्या नुकसान भरपाई मिळत असली तरी शेतकर्‍यांच्या श्रमाचा मोबदला यामध्ये समाविष्ट होत नसल्याने वनक्षेत्राजवळील शेतकर्‍यांना नेहमीच शेतामध्ये विनामोबदला काबाडकष्ट करून हातातोंडाशी आलेलं पिक गमवावे लागत आहे. दरम्यान, वन्यप्राण्यांकडून नुकसानी सोसणार्‍या शेतकर्‍यांचे एक शिष्टमंडळ लवकरच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मेहनतीच्या मोबदल्यासह भरपाई मिळण्याची मागणी करणार असल्याची माहिती बाधित शेतकर्‍यांनी दिली.

पोलादपूर तालुक्यातील सर्वच शेतकरी भातपीक मोठ्या क्षेत्रात घेत असून, बांधावर तुरी, मुग तसेच उतारावर वरी, नाचणीची शेतीदेखील करीत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून पोलादपूर तालुक्यातील शेतकर्‍यांना नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत कापणी होण्याआधीपर्यंत लांबलेल्या पावसामुळे तसेच रानडुकरांच्या कळपांमुळे भातपिकाचे नुकसान सोसावे लागत आहे. दरवर्षी रानडुक्करांमुळे शेतकर्‍यांच्या भातपिकाची हानी झाल्यानंतर होणार्‍या नुकसानीबाबत वनविभागाकडून मिळणार्‍या भरपाईबाबत आधी वन्यप्राण्यांकडून नुकसान होऊ द्या, मगच भरपाई मिळेल, असे धोरण राबविले जात असल्याने या भरपाईच्या रकमेत शेतकर्‍यांच्या काबाडकष्टाची गणती होत नसल्याने ही भरपाई तुटपुंजी ठरत आहे. शेतकर्‍यांना शेताभोवती वन्यप्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी तारांचे कुंपण करण्यासाठीही वनविभागाकडून कोणतेही सहकार्य केले जात नाही, यामुळे शेतकर्‍यांचे एक शिष्टमंडळ राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन श्रमाच्या मोबदल्यासहीत वन्यप्राण्यांमुळे झालेल्या भातशेतीच्या नुकसानीची भरपाई मिळण्याचे निवेदन देणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

तरी वनविभाग आणि कृषी विभागाने सहकार्य करण्याची मागणी सेवानिवृत्त नायब सुभेदार कृष्णा धुमाळ आणि शेडगे, नरे, जगताप आदी शेतकर्‍यांनी केली आहे. पोलादपूर तालुक्यात वन्यजीव सप्ताहानिमित्त जनजागृती कार्यक्रमांमध्ये व्यग्र झालेल्या वनअधिकारी व कर्मचारीवर्गाचे रानडुकरांपासून होणार्‍या हानीकडे सपशेल दुर्लक्ष झाल्याची चर्चाही शेतकर्‍यांकडून उघडउघड होऊ लागली आहे.

Exit mobile version