उकरुलमधील शेतकर्‍यांचा प्रयोगशील शेती करण्याचा निर्धार

। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील उकरूल गावातील शेतकर्‍यांनी प्रयोगशील शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. कृषी संजीवनी सप्ताहाचे निमिताने आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबिरात गावातील 35 शेतकर्‍यांनी सहभाग घेतला होता. उकरूल ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. शेतकरी असलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच वंदना थोरवे यांनी आपल्या गावातील शेतकर्‍यांनी प्रयोगशील शेती करावी, या उद्देशाने आपल्या ग्रामपंचायतीमधील शेतकर्‍यांना शास्त्रज्ञ आणि कृषी अधिकारी यांचे मार्गदर्शन यासाठी गावामध्ये कृषी विभागामार्फत कृषी संजीवनी सप्ताह या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उकरूळ गावातील मंदिरात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला गावातील 35 शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी शीतल शेवाळे, कृषी अनुराधा अंधारे हे उपस्थित होते. त्या सर्वांचे सरपंच वंदना थोरवे यांनी स्वागत केले.

तालुका कृषी अधिकारी शेवाळे यांनी शेतकर्‍यांना भातपिकाच्या लागवडीसाठी योग्य तंत्रज्ञान आत्मसात करण्याबाबत मार्गदर्शन केले. तर, भातपिकाच्या लागवडीसाठी एसआरटी पद्धत, चारसूत्री लागवड पद्धत, ड्रम सीडर पद्धत, यंत्राद्वारे लागवड पद्धत अशा नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, अशी सूचना केली. भातपिकाचे उत्पादन वाढवावे यासाठीदेखील मार्गदर्शन करण्यात आले.

Exit mobile version