आमदार, मंत्र्यांची सुरक्षा कपात
| मुंबई | प्रतिनिधी |
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या आमदार आणि मंत्र्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेत मोठा दणका दिला आहे. यापूर्वी वाय प्लस असलेली मंत्र्यांची सुरक्षा ही वाय दर्जाची करण्यात आली आहे. दरम्यान, शिंदे गटाच्या नाराज आमदार, मंत्र्यांनी याबाबत एकनाथ शिंदेंकडे आपली आपबिती मांडली आहे. त्यावर आपण मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याचे सांगत शिंदेंनी हतबल होऊन वेळ मारुन नेल्याची समजते.
वाय श्रेणी ही सुरक्षेचा तिसरा स्तर आहे. यामध्ये 11 जणांचे पथक सुरक्षा देत असते. त्यात एक किंवा दोन कमांडो आणि एक पोलीस अधिकारीही असतो. मंत्र्यांची सुरक्षा कपात करताना आमदारांची सुरक्षाच काढून घेतल्याची माहिती आहे. 17 फेब्रुवारीपासून शिवसेना आमदार, मंत्र्यांची सुरक्षा काढून घेतली. यामुळे मंत्री, आमदार नाराज झाल्याची माहिती मिळाली. ज्यांच्या जीवाला धोका नाही, अशा व्यक्तीची सुरक्षा कमी केली आहे. त्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीतील लोकप्रतिनिधी आहे. त्यात प्रतापराव चिखलीकर, सुरेश खडे यांच्यासह अनेक जणांची सुरक्षा कपात केली आहे. तसेच यापुढे आमदारांसोबत एकच सुरक्षा रक्षक असणार आहे.