विकास हाच ध्यास : प्रफुल्ल पाटील

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

आक्षी पंचायत समिती मतदार संघातील उमेदवार प्रफुल्ल पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विकासाचा ध्यास घेत त्यांनी ही निवडणूक लढविण्याचा प्रयत्न केला आहे. आक्षी पंचायत समिती मतदार संघातील उमेदवार प्रफुल्ल पाटील यांनी लहानपणापासूनच शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा हाती घेतला आहे. कष्टकरी, शेतकरी कामगार वर्गाच्या विकासाचा ध्यास असणाऱ्या प्रफुल्ल पाटील यांना गेल्या अनेक वर्षापासूनचा राजकीय वारसा आहे. पक्षाचा सेवक म्हणून काम करण्यावर भर देणारे एक व्यक्तीमत्व म्हणून प्रफुल्ल पाटील यांच्याकडे पाहिले जाते. जनसामान्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्यावर अधिक लक्ष देणारे एक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची एक ख्याती आहे. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघात त्यांनी विकासाचा ध्यास घेतला आहे.

जयंत पाटील यांच्यावर निष्ठा ठेवून प्रामाणिकपणे पक्षासाठी काम करणारे व्यक्तीमत्व म्हणून प्रफुल्ल पाटील यांच्याकडे पाहिले जाते. तळागाळातील शेवटच्या घटकाशी संवाद साधण्याबरोबरच संपर्क साधणारा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून ते ओळखले जातात. वेश्वी ग्रामपंचायतीच्या सदस्यपासून सरपंचापर्यंत राजकीय वाटचाल असणारे प्रफुल्ल पाटील यांनी सामाजिक क्षेत्रासह, क्रिडा, शैक्षणिक क्षेत्रातही योगदान दिले आहे. ग्रामपंचायतीच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक विकासकामे मतदार संघात केली आहेत. वाडगाव फाटा येथे पाण्याचा प्रश्न होता. तो प्रश्न स्थानिकांना विश्वासात घेऊन त्यांनी सोडविला. एमआयडीसीमार्फत पाणी पुरवठा उपलब्ध करून दिला. गोंधळपाडा, वाडगाव फाटा, वेश्वी येथे अद्ययावत स्मशानभूमी बांधली असून तरुणांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी व्यायामशाळा तसेच खुली व्यायाम शाळा बांधण्यावर भर दिला. तसेच उद्यान व प्रत्येक घरापर्यंत रस्ता तयार केला. आजपर्यंत त्यांनी अनेक उपक्रम वेश्वी ग्रामपंचायतीमध्ये राबविले.
प्रफुल्ल पाटील यांनी सामाजिक उपक्रम राबवित असताना क्रिडा शैक्षणिक उपक्रमाला महत्व दिले आहे. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी प्रोत्साहन कार्यक्रम घेण्यावर त्यांनी भर दिला.

गेल्या अनेक वर्षांपासून प्रफुल्ल पाटील यांनी पुढाकार घेत क्रिडा स्पर्धा घेऊन स्थानिक खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ देण्याचा प्रयत्न केला आहे. आरोग्यम धन संपदा हे ब्रीद वाक्य घेऊन शरीर सदृढ ठेवण्याकडे त्यांचे लक्ष कायम राहिले आहे. त्यामुळे त्यांची एक वेगळी ओळख आहे.

ग्रामपंचायतीच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक विकासकामे केली आहेत. ग्रामपंचायत हद्दीसह परिसरातील गावांमधील पाणी, रस्ते, आदी अनेक प्रश्न सोडविण्याचे काम त्यांनी केले आहे. तळवलीमध्ये विसर्जन घाट, स्मशानभूमी निवारा शेड, खंडाळा गावात जळीत शेड, स्मशानभूमी बांधली. बौध्दवाडीमध्ये प्रत्येकाच्या घरात शौचालय बांधले. नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून पोवाळेमधील पुल तातडीने बांधला. बेलकडेमध्ये सुसज्ज स्मशानभूमी, रस्ते, पिंडदान शेड बांधले. पंचायत समिती गणातील आक्षी गावात एमआयडीसीमध्ये पाण्याचे कनेक्शन उपलब्ध करून दिले. प्रफुल्ल पाटील यांनी केलेल्या अनेक विकासकामांमुळे त्यांचे पारड जड असून वेश्वीसह गोंधळपाड्यातील जनता बहुमत देतील, असा विश्वास महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे.

आक्षी पंचायत समिती गणातून निवडून आल्यावर मतदार संघाचा सर्वांगीण विकास हाच ध्यास असणार आहे. पंचायत व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक योजना राबवून या मतदार संघाचा कायापालट करण्याचा त्यांचा मानस आहे. रस्ते, पाणी, समाज मंदिर आदी प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न त्यांनी कायमच केला असून भविष्यातही ते समाजहितासाठी कार्य करतील. गावे, वाड्यांमधील रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावले जातील. शिकलेल्या तरुणांना शेकापच्या माध्यमातून वेगवेगळ्या संस्थामध्ये रोजगार देण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी काळात हाच प्रयत्न कायम ठेवून वेगवेगळ्या क्षेत्रात तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वास यानिमित्ताने त्यांनी व्यक्त केला.

Exit mobile version